२२ हजारांवर नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 05:28 IST2017-08-15T05:26:43+5:302017-08-15T05:28:49+5:30
माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पाचव्या स्मृतिदिनी बाभळगाव (जि. लातूर) येथील विलासबागेत मराठवाड्यासह राज्यातील चाहत्यांनी आपल्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली.

२२ हजारांवर नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
लातूर : माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पाचव्या स्मृतिदिनी बाभळगाव (जि. लातूर) येथील विलासबागेत मराठवाड्यासह राज्यातील चाहत्यांनी आपल्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली. जिल्ह्यात सोमवारी दिवसभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. दीडशे रुग्णालयांमध्ये २२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.
विलासबाग येथे सोमवारी सकाळी ९ वाजता सामुदायिक प्रार्थना सभा झाली. माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, सुवर्णाताई देशमुख, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख, आदिती देशमुख, धीरज देशमुख, अवीर व अवन देशमुख, अभिजित देशमुख, सत्यजीत देशमुख, जयसिंगराव देशमुख यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. या वेळी लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
दिवसभर शहरातील दीडशे रुग्णालयांमध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच ज्यांना शस्त्रक्रिया व पुढील उपचार घ्यायचे आहेत, त्यांनाही सवलत दिली जाणार असल्याचे समन्वयक डॉ. कल्याण बरमदे यांनी सांगितले.