दर घसरल्याने दीड एकरातील कोथिंबिरीचे मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:21 IST2021-05-20T04:21:00+5:302021-05-20T04:21:00+5:30
शिरूर अनंतपाळ : बाजारपेठेत कोथिंबिरीचे भाव घसरल्याने तालुक्यातील शेंद उत्तर येथील एका शेतकऱ्याने दीड एकरातील कोथिंबिरीचे चक्क मोफत वाटप ...

दर घसरल्याने दीड एकरातील कोथिंबिरीचे मोफत वाटप
शिरूर अनंतपाळ : बाजारपेठेत कोथिंबिरीचे भाव घसरल्याने तालुक्यातील शेंद उत्तर येथील एका शेतकऱ्याने दीड एकरातील कोथिंबिरीचे चक्क मोफत वाटप केले. कोथिंबिरीचे मोफत वाटप होत असल्याची माहिती मिळताच गावातील नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाल्याचे पाहावयास मिळाले.
पाटबंधारे विभागात नोकरीस असलेल्या तालुक्यातील शेंद उत्तर येथील गोविंदराव मोरे यांनी मेहनतीने दीड एकरात कोथिंबिरीची लागवड केली होती. दीड महिन्यात कोथिंबीर चांगलीच बहरली. व्यापारी कोथिंबीर विकत घेण्यासाठी चकरा मारीत होते. चांगला दर मिळेल, अशी त्यांना आशा होती. त्यामुळे कोथिंबिरीची काढणी केली. परंतु, बाजारपेठेत कोथिंबिरीचे भाव मोठ्या प्रमाणात घसरल्याचे पाहून मोरे यांनी कोथिंबिरीची विक्री करण्यापेक्षा ती गोरगरिबांना वाटप करण्याचे ठरविले आणि भाड्याचा टेम्पो घेऊन त्यात कोथिंबीर भरली. तालुक्यातील दैठणा येथील मुख्य रस्त्यासह अन्य चौकांत टेम्पो उभा करून ‘मोफत कोथिंबीर घेऊन जा,’ असे आवाहन करू लागले. मोफत कोथिंबीर मिळत असल्याचे ऐकून नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. अनेकांनी कोथिंबिरीच्या चार- चार जुड्या घेतल्या.
५० हजारांचा लागवड खर्च...
कोथिंबिरीची लागवड करण्यासाठी शेतीच्या मशागतीपासून ते पेरणीपर्यंत आणि पेरणीपासून काढणीपर्यंत ५० हजार रुपये खर्च आला होता; परंतु बाजारपेठेत कोथिंबिरीचे भाव पडल्याने विक्री करून २५ हजार रुपये तरी पदरी पडतील की नाही ,याबाबत साशंकता वाटत होती. म्हणूनच कोथिंबीर मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचे गोविंदराव मोरे यांनी सांगितले.
दीड एकरातील कोथिंबिरीतून दीड लाखाचे उत्पादन अपेक्षित होते; परंतु कोथिंबीर काढणीला आल्यानंतर बाजारपेठेत भाव घसरले. त्यातच लाॅकडाऊन, संचारबंदीचा फटका बसला असल्याचे मोरे म्हणाले.