लातूर : हज यात्रेला पाठवताे, असे सांगत लातूरमधील जवळपास २७ यात्रेकरुंकडून प्रत्येकी ३५ हजार रुपये घेऊन काही यात्रेकरुंना हजला पाठवले. मात्र, त्यांना तेथे सुविधा दिल्या नाहीत तर काहींना पैसे घेऊनही हज यात्रेला पाठवले नाही. याप्रकरणी शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. यातील आराेपीला लातूर पाेलिसांनी मुंबई शहरातून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, ईरशाद महेमुदअली मीर (४९, रा. औरंगाबाद) याच्यासह अन्य दाेघांनी लातूर येथील जवळपास २७ हज यात्रेकरुंना २०१९-२०मध्ये हज यात्रेला पाठविण्यासाठी प्रत्येकी ३५ हजार रुपये घेतले हाेते. दरम्यान, यातील केवळ १३ यात्रेकरुंनाच हजला पाठवले. मात्र, तेथील राहणे, खाणे आणि परतीच्या प्रवासाची ‘त्या’ १३ यात्रेकरुंची काेणतीही व्यवस्था केली नाही. तर उर्वरित यात्रेकरुंना हजला पाठवले नाही. यातून यात्रेकरुंची फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन दाेन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. तेव्हापासून आराेपीच्या मागावर लातूर पाेलीस हाेते. दरम्यान, ईरशाद महेमुदअली मीर याला मुंबई येथून अटक करण्यात आली. त्याला लातूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे, अशी माहिती पाेलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी दिली. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक एम. आय. मेतलवाड करत आहेत.
मुंबई, औरंगाबाद, लातुरात गुन्हे दाखल...
हज यात्रेसाठी स्थापन करण्यात आलेल्या एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून ईरशाद महेमुदअली मीर याच्यासह अन्य दाेघांनी मुंबई, औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यातील हज यात्रेकरुंची फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला आहे. याबाबत मुंबई येथील नागपाडा, औरंगाबाद शहरातील जिन्सी आणि लातुरातील शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात फसवणुकीचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असेही पाेलीस निरीक्षक पुजारी म्हणाले.