रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील मोरवड येथे प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी महसूल विभाग रेणापूर, भूमी अभिलेख कार्यालय रेणापूर तसेच मोनार्च कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सक्तीने जमीन मोजणी करण्याचा प्रयत्न केल्याने मंगळवारी परिसरात तणाव निर्माण झाला. काही शेतकऱ्यांनी गळफास, काहींनी विहिरीत उडी तर काहींनी स्वत:ला आगीत झोकून देण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.
शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अविनाश कोरडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट शेतात जाऊन मोजणी सुरू करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता पोलीस निरीक्षक देडे यांच्या उपस्थितीत जबरदस्ती केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी टोकाची पावले उचलण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. काही शेतकऱ्यांनी गळफास घेण्याचा, काहींनी स्वतःला आगीत झोकून देण्याचा, तर काहींनी विहिरीत उडी टाकण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच अधिकारी व कर्मचारी यांनी माघार घेतली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी प्रचंड मानसिक तणावात असल्याचे दिसून आले.
मोरवड गावाचे क्षेत्र इतर दोन गावांना लागून असून, महामार्ग झाल्यास मोठ्या प्रमाणात पाणी साठून शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच चाडगाव येथून मोरवड व नांदगावकडे गेलेली मांजरा डावा कालव्याची पाइपलाइन पूर्णतः नष्ट होऊन सध्या बागायती असलेले क्षेत्र कोरडवाहू होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कधीही भरून न निघणारे नुकसानअनेक शेतकऱ्यांनी अल्प भूखंड विकून कालव्यावरून पाइपलाइन टाकत बागायती शेती विकसित केली आहे. अशा सुपीक व बागायती क्षेत्रातून महामार्ग गेल्यास हजारो शेतकऱ्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान होणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी आजूबाजूच्या गावांतील शेतकरीही मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते. या आंदोलनात दिलीपराव कुलकर्णी, सुधीर खुरसाळे, प्रकाश चव्हाण, राहुल माने, संभाजी हाके, नीळकंठ भिसे, कल्याण देशमुख, उत्तमराव जाधव, गजेंद्र येळकर, संजय माने, युवराज माने, गणेश माने, महेश माने, दशरथ माने, विश्वंभर जाधव, मंजूरखा पठाण, निवृत्ती माने आदी शेतकरी सहभागी होते.
Web Summary : Farmers in Morwad, Renapur protested against forced land surveys for the Shaktipeeth Highway. Some attempted suicide, leading to police intervention. They fear waterlogging and irrigation loss. The project threatens fertile land and livelihoods.
Web Summary : रेनापुर के मोरवाड़ में शक्तिपीठ राजमार्ग के लिए जबरन भूमि सर्वेक्षण का किसानों ने विरोध किया। कुछ ने आत्महत्या का प्रयास किया, जिसके बाद पुलिस ने हस्तक्षेप किया। उन्हें जलभराव और सिंचाई के नुकसान का डर है। परियोजना से उपजाऊ भूमि और आजीविका खतरे में हैं।