माळरानावर फुलविली केळीची बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:19 IST2021-04-13T04:19:01+5:302021-04-13T04:19:01+5:30
किनगाव : पारंपरिक पध्दतीने शेतीत नफा होत नसल्याचे पाहून अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने प्रयोगशील शेतीकडे लक्ष ...

माळरानावर फुलविली केळीची बाग
किनगाव : पारंपरिक पध्दतीने शेतीत नफा होत नसल्याचे पाहून अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने प्रयोगशील शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. गत एप्रिलमध्ये अर्धा एकरवर केळीच्या बागेची लागवड केली. सध्या ही बाग बहरली असून केळी तोडणीस आली आहे. त्यातून त्यांना २ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतकरी आता पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेतीकडे वळले आहेत. त्यातच सेंद्रिय शेतीवर भर दिला जात आहे. अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी शिवहर केंद्रे यांनी आपल्या अर्धा एकर शेतीत गत एप्रिलमध्ये केळीच्या बागेची लागवड केली. त्यासाठी २ बाय २ फुटाचे खड्डे घेऊन प्रत्येक खड्ड्यांत १० किलो शेणखत टाकले. तिथे केळीच्या रोपांची लागवड केली. दोन रोपांमध्ये ७ बाय ८ फुटाचे अंतर ठेवले. पाण्याचा काटकसरीने वापर करीत ठिबक सिंचन केले. सेंद्रिय पध्दतीने केळीची जपणूक केली आहे.
सध्या केळीची बाग बहरली आहे. एका झाडास ९ ते १० डझन फळ लागले आहे. सध्या केळी तोडणीस आली आहे. केळी लागवडीपासून ते तोडणीपर्यंत ५० हजारांचा खर्च झाला आहे. या बागेतून खर्च वगळता दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.
पारंपरिक शेती परवडणारी नाही...
शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. पारंपरिक शेती परवडणारी नाही. त्यामुळे आधुनिक शेतीकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. विशेषत: फळबाग लागवड करावी. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. आम्ही माळरानावर गाळ आणून टाकून केळीच्या बागेची लागवड केली आहे. त्यातून खर्च वगळता दोन लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
- शिवहर केंद्रे, शेतकरी.