अहमदपूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत अहमदपूर तालुक्यातील ५ हजार ३९९ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३० कोटी ८ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत, तर आधार प्रमाणीकरणाअभावी १८६ शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित आहेत.
अहमदपूर तालुक्यात महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी ५ हजार ६९३ शेतकरी पात्र होते. त्यातील ५ हजार ५०७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीपोटी शासनाच्या वतीने ३० कोटी ८ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. यामध्ये बँक ऑफ इंडिया १४९ खातेदार १ कोटी ७० लाख, बँक ऑफ महाराष्ट्र ८८१ खातेदार ६ कोटी ३२ लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया १०१ खातेदार १ कोटी ४२ लाख, एचडीएफसी बँक ६ खातेदार २२ लाख, आयसीआयसीआय बँक १ खातेदार १ लाख, आयडीबीआय बँक १६ खातेदार १ कोटी, इंडियन ओव्हरसीज बँक २९५ खातेदार २ कोटी ५४ लाख, तर जिल्हा मध्यवर्ती बँक सर्व शाखांमधील २ हजार ३४१ खातेदार ७ कोटी ६० लाख, महाराष्ट्र ग्रामीण बँक ४३६ खातेदार ३ कोटी ६९ लाख, पंजाब नॅशनल बँकेच्या एका खातेदाराच्या नावावर २ लाख, तर बँक ऑफ इंडियाच्या १ हजार ८१ खातेदारांच्या नावावर ७ कोटी १६ लाख रुपये शासनाच्या वतीने कर्जमुक्तीपोटी जमा करण्यात आले आहेत.
आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन
अहमदपूर तालुक्यातील १८६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण राहिले आहे. परिणामी, सदरील शेतकरी कर्जमुक्ती, तसेच नवीन पीक कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे महा- ई- सेवा केंद्र येथे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी केले आहे.
कर्ज वितरणासाठी बँकांकडे पाठपुरावा
खरीप हंगाम जवळ आला असून, कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्जपुरवठा करावा यासाठी बँकांकडे पाठपुरावा केला जात आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती यादी मध्येनाव आहे व त्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांना पुढील वर्षासाठी बँकेच्या वतीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी बँकेकडे प्रस्ताव पाठवावेत, असे सहायक निबंधक वसंत घुले यांनी सांगितले.