दुचाकी, मोबाईल चोरीसह घरफोडी करणारे पाच आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:06+5:302021-06-04T04:16:06+5:30
लातूर : दुचाकी, मोबाईलची चोरी करणारे तसेच घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या पाचजणांना शहर पोलीस उपाधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी गजाआड ...

दुचाकी, मोबाईल चोरीसह घरफोडी करणारे पाच आरोपी गजाआड
लातूर : दुचाकी, मोबाईलची चोरी करणारे तसेच घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या पाचजणांना शहर पोलीस उपाधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी गजाआड केले असून, त्यांच्याकडून दहा मोबाईल व चार दुचाकी असा एकूण ३ लाख १५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. रेणापूर येथे बऱ्याच दुचाकी चोरीच्या आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाला बातमीदारामार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने रेणापूर येथे जाऊन मारोती शिवाजी पाडोळे (रा. संजय नगर, रेणापूर), अभिषेक सुरेश इंगावले (रा. संजय नगर, रेणापूर), गोविंद विश्वनाथ वाघे (शिवाजीनगर, रेणापूर), अक्षय उर्फ कृष्णा देविदास शिंदे (व्हतार गल्ली, रेणापूर) यांच्याकडे चोरीला गेलेल्या दुचाकींबाबत माहिती घेतली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, एमआयडीसी पोलीस ठाणे, औसा पोलीस ठाणे, किल्लारी, कंधार पोलीस ठाण्यात चोरीची नोंद झालेल्या चार दुचाकी आढळल्या. त्या जप्त करण्यात आल्या असून, त्यांची किंमत ३ लाख १५ हजार रुपये आहे. या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांचा मुख्य सूत्रधार ज्ञानेश्वर बालाजी जाधव (रा. संजय नगर, रेणापूर) असल्याची कबुली दिली. त्यानुसार तपास सुरु असून, आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तर पाचवा आरोपी लातूर शहरातील प्रकाश नगर येथे किराणा दुकानाचे शटर तोडून चोरी केल्याच्या गुन्ह्यातील आहे. त्याच्याकडे एकूण दहा मोबाईल आढळले असून, त्याचे नाव सुनील विठ्ठल भोसले आहे. दरम्यान, ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वहिद शेख, हेडकाॅन्स्टेबल रामचंद्र ढगे, महेश पारडे, पोलीस नाईक अभिमन्यू सोनटक्के, सोमनाथ खटके, दत्ता शिंदे, ओम बेस्के यांनी केली.