तलाव कोरडे पडल्याने मत्स्य व्यावसायिकांची तडफड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:15 IST2021-05-31T04:15:50+5:302021-05-31T04:15:50+5:30

अहमदपूर : गेल्या वर्षी अधिक पाऊस झाल्याने तालुक्यातील मत्स्य व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, उन्हाळ्यात तलाव कोरडे पडल्याने त्यात ...

Fishermen suffer as lake dries up | तलाव कोरडे पडल्याने मत्स्य व्यावसायिकांची तडफड

तलाव कोरडे पडल्याने मत्स्य व्यावसायिकांची तडफड

अहमदपूर : गेल्या वर्षी अधिक पाऊस झाल्याने तालुक्यातील मत्स्य व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, उन्हाळ्यात तलाव कोरडे पडल्याने त्यात सोडलेले हजारो रुपयांच्या मत्स्य बीजांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यवसायासाठी केलेला खर्चही पदरी पडला नसल्याने येथील १५२ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे तालुक्यातील नागठाणा, गोताळा, धसवाडी, सोनखेड, मोघा, तेलगाव, कौडगाव, येस्तार, यलदरी, ढाळेगाव, तांबट सांगवी, हगदळ-गुगदळ, अहमदपूर, पाटोदा, खंडाळी, अंधोरी, काळेगाव, उगिलेवाडी, सावरगाव (थोट), हंगेवाडी, मावलगाव, मोळवण तसेच भुत्तेकरवाडी, गोताळा, नांदुरा (वाकी), अहमदपूर साठवण तलाव, थोडगा, फुलमाळा, लांजी येथील तलावात चांगला जलसाठा झाला होता. त्यामुळे भुत्तेकरवाडी, गोताळा, नांदुरा (वाकी), अहमदपूर साठवण तलाव, थोडगा, फुलमाळा, लांजी तलावाचा ठेका अहमदपूर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या माध्यमातून भरण्यात आला. या संस्थेचे १५२ क्रियाशील सदस्य आहे. यावर्षी दहा लाख खर्चून ठेका घेऊन १५ लाख मत्स्यबीज सोडले होते. त्यामुळे चांगले उत्पन्न पदरी पडेल, अशी आशा होती. परंतु, वाढत्या उन्हामुळे आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करण्यात आल्याने तलाव कोरडे पडले आहेत. परिणामी, मत्स्य बीजांची तडफड होऊन मृत्युमुखी पडले आहेत.

अहमदपूर तालुक्यात भोई समाजाचे ३०० मच्छीमार आहेत. मत्स्यविक्री हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून, त्यावरच कुटुंब अवलंबून आहे. दरम्यान, फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी पातळी घटण्यास सुरुवात होऊन त्याचा मत्स्य बीजांवर परिणाम झाला आहे. परिणामी, व्यवसायासाठीचा खर्च हा निष्फळ ठरला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांपुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबातील व्यक्तींचे पोट कसे भरावे आणि जर घरातील कोणी आजारी पडला तर उपचारासाठी पैसे कोठून आणावेत, अशी भ्रांत पडली आहे. त्यामुळे येथील काही कुटुंबांनी स्थलांतराचा मार्ग अवलंबिला आहे.

शासनाने आर्थिक मदत द्यावी...

तालुक्यात मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. यंदा कोरोनाचे संकट आणि तलाव कोरडे पडल्याने हा व्यवसाय कोलमडला आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या सदस्यांनी केली आहे.

पुढील वर्षीचा ठेका मोफत द्यावा...

कोरोनामुळे सर्व उद्योग, व्यवसाय संकटात सापडले आहेत. त्यावर आधारित कामगारांची उपासमार होत आहे. त्यामुळे शासनाने अनुदानपर नुकसान भरपाई द्यावी. तसेच पाच वर्षांपासून मत्स्य व्यवसाय सतत तोट्यात आहे. तलाव कोरडे पडत असल्यामुळे लाखो रुपयांचा फटका बसत आहे. शासनाने आर्थिक मदत देऊन पुढील वर्षीचा ठेका मोफत द्यावा, अशी मागणी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष गजानन अनंतवाळ यांनी केली.

पोटासाठी स्थलांतराची वेळ...

अहमदपूर तालुक्यातील तलाव कोरडे पडले आहेत. पाणी नसल्याने हा व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना पोट भरण्यासाठी स्थलांतर करावे लागत आहे, असे मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष धुराजी चिलकरवार, सचिव निलाजी डुक्करे यांनी सांगितले.

Web Title: Fishermen suffer as lake dries up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.