वीस वर्षांनंतर पहिल्यांदाच झाले ‘लालपरी’चे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST2021-03-10T04:20:44+5:302021-03-10T04:20:44+5:30
औसा तालुक्यातील बेलकुंड हे जवळपास ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव आहे. गावात पूर्वी सोलापूर आणि लातूरला जाणाऱ्या एस.टी. ...

वीस वर्षांनंतर पहिल्यांदाच झाले ‘लालपरी’चे दर्शन
औसा तालुक्यातील बेलकुंड हे जवळपास ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव आहे. गावात पूर्वी सोलापूर आणि लातूरला जाणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या बसेस येत असत; मात्र जवळपास २० वर्षांपासून गावात बस येणे बंदच झाले होते. परिणामी, तालुक्याला शिक्षणासाठी, कार्यालयीन, खासगी कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांची, विद्यार्थ्यांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड हाेत हाेती. शिवाय, बेलकुंड येथील नागरिकांना, विद्यार्थ्यांना औसा अथवा लातूरला जाण्यासाठी एक किलोमीटरची पायपीट करत बेलकुंडमोड गाठावे लागत हाेते. मोडवर थांबूनही अनेक बसेस उड्डाण पुलावरून जात असल्याने प्रवाशांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. दरम्यान, सरपंच विष्णू कोळी यांनी यासाठी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला हाेता. गत २० वर्षांपासून होत असलेल्या बसच्या मागणीकडे महामंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मंगळवारपासून औसा-बेलकुंड ही नवीन बससेवा सुरू केली आहे. यातून प्रवाशांची साेय हाेणार आहे.
गावकऱ्यांची झाली साेय...
गावात बस दाखल झाल्यानंतर फटाके फोडून ‘लालपरी’चे ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी बसची पूजा करून बसचालक अनिल गोरे, वाहक एम.एच. नागरगोजे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच विष्णू कोळी, उपसरपंच सचिन पवार, ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य अपसिंगेकर,व्यंकट गोरे, बलभीम बंडगर, अनिल तोळमारे, गणेश यादव यांच्यासह गावकरी, प्रवासी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.