आरक्षण सोडतीने रंगली रेणापूर नगर पंचायतीची पहीली निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 15:36 IST2016-10-27T15:36:21+5:302016-10-27T15:36:21+5:30
नव्यानेच अस्तित्वात आलेल्या रेणापूर नगर पंचायतीच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली.

आरक्षण सोडतीने रंगली रेणापूर नगर पंचायतीची पहीली निवडणूक
ऑनलाइन लोकमत
रेणापूर, दि. 27 : नव्यानेच अस्तित्वात आलेल्या रेणापूर नगर पंचायतीच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात १७ पैकी ९ प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहे. पाच प्रभाग सर्वांसाठी खुले झाले आहेत.
रेणापूर ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आल्याने या नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारणसाठी खुले आहे. गुरुवारी येथील तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत अक्षता जोगदंड व रुहान मुजावर या बालकांच्या हस्ते चिठ्ठ्यांद्वारे काढण्यात आली.
रेणापूर नगरपंचायतीत १७ प्रभाग असून, त्यापैकी पाच प्रभाग सर्वसाधारण महिलेसाठी खुले झाले आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी तीन प्रभाग आरक्षित झाले आहेत. तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दोन प्रभाग खुले झाले आहेत. अनुसूचित जातीतील महिलेसाठी १ प्रभाग आरक्षित असून, अनुसूचित जातीतील पुरुषांसाठी एक प्रभाग खुला झाला आहे. त्याचबरोबर ५ प्रभाग सर्वांसाठी खुले झाले आहेत.
यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार मंजुषा लटपटे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. किरण सुलवाड, लातूरचे नायब तहसीलदार हरिश्चंद्र काळे, नगरपंचायतीचे प्रभारी अभियंता के.एस. वारद आदी उपस्थित होते. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारणसाठी खुले झाल्याने अनेकांची उत्सुकता वाढली होती. मात्र आरक्षण सोडतीमुळे काहींची घोरनिराशा झाली आहे.
असे आहे आरक्षण...
प्रभाग १ : सर्वसाधारण (महिला), प्रभाग २ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग ३ : सर्वसाधारण (महिला), प्रभाग ४ : अनुसूचित जाती (महिला), प्रभाग ५ व ६ : नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ७ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग ८ व ९ : सर्वसाधारण, प्रभाग १० : सर्वसाधारण (महिला), प्रभाग ११ : सर्वसाधारण, प्रभाग १२ : सर्वसाधारण (महिला), प्रभाग १३ व १४ : सर्वसाधारण, प्रभाग १५ : अनुसूचित जाती, प्रभाग १६ : सर्वसाधारण (महिला), प्रभाग १७ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)