रामलिंग मुदगड शौचालय प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST2021-03-16T04:20:22+5:302021-03-16T04:20:22+5:30
शौचालयाच्या कामात १२ लाख ९६ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी उपाेषण करण्यात आले. या प्रकरणात १० लाख ४५ हजार ...

रामलिंग मुदगड शौचालय प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार
शौचालयाच्या कामात १२ लाख ९६ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी उपाेषण करण्यात आले. या प्रकरणात १० लाख ४५ हजार रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. आता या प्रकरणात ग्रामसेवक आणि संबंधिताची चौकशी करण्याची मागणी हाेत आहे.
निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे शौचालयाचे १२ लाख ९६ हजार रुपये ग्रामसेवक आणि संबंधितांनी परस्पर उचलून गैरव्यवहार केल्याचे प्रकरण उपोषण केल्यानंतर समाेर आले. हे प्रकरण उजेडात येताच यातील १० लाख ४५ हजार ७७ रुपये सरपंच आणि ग्रामसेवकांनी परस्पर ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा केले आहेत. मात्र, या प्रकरणावर आता निलंगा पंचायत समिती काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रामलिंग मुदगड हे गाव औसा मतदारसंघात येत असून, गावची कुटुंब संख्या ४६८ आहे. यातील १३५ कुटुंबांनी स्वतः शौचालयाचे बांधकाम केले आहे. यातील ३३३ कुटुंबाच्या शौचालयाचे बांधकाम शिल्लक होते. ३१ डिसेंबर २०१८ पूर्वी गाव हगणदारीमुक्त होण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या खात्यावर शासनाने शौचालय बांधकामासाठी रक्कम जमा केली हाेती. मात्र, १०८ शौचालय खड्ड्यांचा प्रत्येकी बारा हजार रुपये याप्रमाणे १२ लाख ९६ हजार रुपये ग्रामसेवक आणि सरपंचाने परस्पर उचलून सदर रकमेचा गैरव्यवहार केला. यावेळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला बसवराज हुलपल्ले यांच्या शौचालय खड्ड्याचे पैसे गायब झाल्याचे वेळीच त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी तातडीने ८ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत ग्रामपंचायतीच्या समोर उपोषण सुरू केले. या प्रकरणाची चाैकशी करून, दाेषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. १२ फेब्रुवारी रोजी तहसीलदार गणेश जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन २५ तारखेपर्यंत या प्रकरणाचा छडा लावत दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले. परिणामी, या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी विस्ताराधिकारी संजय हाडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी प्रकरणाची चौकशी केली.
ग्रामसेवक आणि सरपंचांनी या प्रकरणात १२ लाख ६९ हजारांपैकी ७ लाख ७४ हजार ७७ रुपये, ३ लाख रुपये असे एकूण १० लाख ४५ हजार ७७ रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा केले आहेत. सदर प्रकरणात पैशाचा गैरव्यवहार केल्याचे दिसून आल्याचा अहवाल चौकशी अधिकारी आडे यांनी वरिष्ठांकडे सादर केला आहे. गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, विस्तार अधिकारी यांचा अहवाल आजच माझ्याकडे उपलब्ध झाला आहे. माझ्या अधिकारात जे आहे. येत्या सात दिवसांत कारवाई केली जाणार आहे.