अहमदपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विवाह सोहळ्यावर विविध निर्बंध आले आहेत. परिणामी, सध्या विवाह सोहळा, वरात ही घोड्याविना होत आहे. परिणामी, त्यावर उपजीविका करणाऱ्या काळेगाव येथील १५ कुटुंबांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीपासून लग्नसोहळे मर्यादित स्वरूपात होत आहे. तसेच मिरवणूक, वरातीवरही बंधने आली आहेत. त्याचा सर्वाधिक फटका घोडे सांभाळणाऱ्यांना बसला आहे. सर्वसाधारणपणे नवरदेवाची मिरवणूक अथवा वरातीसाठी घोडा असणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाते. त्यातून एका घोडेवाल्यास किमान ३ ते ५ हजार रुपये मानधन मिळते. त्याचबरोबर घोड्याला लागणारा खुराक मिळतो. मात्र सध्या घोड्याविना वरात आणि वरातीविना विवाह सोहळा पार पडत आहे. परिणामी, काळेगाव येथील १५ कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकाच गावातील १५ घरात घोडे असून तेथील घोड्यांचा उपयोग हा वरात व शेवंतीसाठी केला जातो. परंतु, सध्या सदरील कुटुंबांना घोड्याच्या चंदीसाठीही अडचणी येत आहे. केवळ आता शेतात जाण्यासाठी घोड्यांचा वापर होत आहे. शासनाकडूनही कुठलीही मदत त्यांना मिळाली नाही. या व्यवसायात सय्यद जागीरदार, सय्यद मुजफ्फर, सय्यद माजिद, सय्यद जुनेद, सय्यद अकबर, सय्यद अखलाक हे पिढ्यान पिढ्यांपासून काम करीत आहेत. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे.
खुराकाचा भाव वाढला...
काळेगाव येथे १५ ते २० घोडे सांभाळणारे असून त्यांचा पिढीजात हा व्यवसाय आहे. सध्या कुठलेही काम नाही. मात्र घोड्याला आवश्यक असणाऱ्या खुराकाचे भाव दुप्पट वाढले आहेत. त्यामुळे अडचण येत असल्याचे काळेगाव येथील घोडे मालक सय्यद अझहर जहागीरदार यांनी सांगितले.
अनेक पिढ्यांपासून व्यवसाय...
अहमदपूर जवळील काळेगाव येथे जहागीरदार यांचे मोठे कुटुंब असून त्यातील अनेक व्यक्ती दुबईत काम करतात. मात्र पूर्वजांना घोडे सांभाळण्याचा छंद होता. त्यानंतर पुढील पिढीने त्याचे व्यवसायात रूपांतर केले. विवाह समारंभात घोड्यावरून वरात काढणे हे प्रतिष्ठेचे समजले जात असे. मात्र आता छोटेखानी विवाह होत असल्याने अडचणी वाढल्या असल्याचे त्यांनी सांगितले.