अखेर किल्लारीचा ३० खेडी पाणीपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST2021-05-05T04:32:10+5:302021-05-05T04:32:10+5:30
किल्लारी : थकीत बिलामुळे महावितरणने २० जानेवारीस ३० खेडी वीजपुरवठा योजनेचा वीजपुरवठा तोडला होता. त्यामुळे नागरिकांची भटकंती सुरू झाली ...

अखेर किल्लारीचा ३० खेडी पाणीपुरवठा सुरू
किल्लारी : थकीत बिलामुळे महावितरणने २० जानेवारीस ३० खेडी वीजपुरवठा योजनेचा वीजपुरवठा तोडला होता. त्यामुळे नागरिकांची भटकंती सुरू झाली होती. दरम्यान, खा. ओमराजे निंबाळकर यांच्यापुढे ही समस्या मांडली असता त्यांनी वीजजोडणी तत्काळ करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नागरिकांनी पायपीट थांबली आहे.
औसा तालुक्यातील किल्लारीस निम्न तेरणा प्रकल्पातून ३० खेडी पाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. परंतु, सतत विविध कारणांनी पाणीपुरवठा बंद होतो. दरम्यान, महावितरणने थकीत बिलापोटी २० जानेवारीस या योजनेचा वीजपुरवठा तोडला. परिणामी, गावातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली होती. ही समस्या सोडविण्यात यावी, अशी सातत्याने लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात येत होती.
दरम्यान, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयास भेट दिली होती. तेव्हा गावकऱ्यांनी पाण्याची व्यथा मांडली. यावेळी किशोर जाधव, उपसरपंच युवराज गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले, बाळू महाराज व नागरिकांनी पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली. गावातील नागरिकांची समस्या ऐकून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लातूरच्या मुख्य अभियंत्यांस सूचना करून वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. माकणी प्रकल्पावरील अभियंता कपाळे यांनी वीजपुरवठा जोडल्याने पाणीपुरवठा १ मे रोजी सुरू झाल्याचे सांगितले. पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
विकतच्या पाण्यावर तहान...
निम्न तेरणा प्रकल्पावरून किल्लारीस पाणीपुरवठा होतो. ही जलवाहिनी भूकंपानंतर टाकण्यात आली आहे. परंतु, ती निकृष्ट दर्जाची असल्याने सतत फुटत असते. तसेच विद्युत मोटार सातत्याने जळते. गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या आहे. वास्तविक किल्लारी हे औसा तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. मात्र, येथील नागरिकांना सतत पाण्यासाठी भटकंती करावी लागते. विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. सध्या वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याने तात्पुरती अडचण दूर झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.