अखेर जळकोटच्या विश्रामगृहासाठी जागा निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST2021-03-27T04:20:27+5:302021-03-27T04:20:27+5:30
जळकोट हे तालुक्याचे ठिकाण असतानाही येथे शासकीय विश्रामगृह नव्हते. त्यामुळे बाहेरगावहून येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना थांबण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. ...

अखेर जळकोटच्या विश्रामगृहासाठी जागा निश्चित
जळकोट हे तालुक्याचे ठिकाण असतानाही येथे शासकीय विश्रामगृह नव्हते. त्यामुळे बाहेरगावहून येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना थांबण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. तसेच बैठक घेण्यासाठी अडचण होत होती. अनेकदा लोकप्रतिनिधींना पदाधिकाऱ्यांच्या तर अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांकडे थांबावे लागत होते. ही अडचण जाणून घेऊन पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. अखेर शासकीय विश्रामगृहासाठी ६ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्यानंतर जागेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या विशेष पुढाकाराने विश्रामगृहाची जागा निश्चित करण्यात आली आहे. अनंत पवार व शरद पवार यांची कुणकी रोडवरील जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता विश्रामगृहाचा प्रश्न मार्गी लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मधुसूदन कांडलीकर यांनी जागा व बांधकामाबाबतचा गुंता मिटविला. त्यामुळे बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन विश्रामगृहासाठी संपादित करण्यात येत आहे, त्या शेतकऱ्यांना शासन नियमाप्रमाणे मावेजा देण्यात येणार आहे.