लोकमत न्यूज नेटवर्क
बेलकुंड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात संसर्गाने कहर केला होता. त्यात अनेकांना जीवदेखील गमवावा लागला. औसा तालुक्यातील माळूंब्रा हे गाव तर दुसरी लाट ओसरल्यावर हॉटस्पॉट बनले होते. परंतु, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व गावकऱ्यांनी विविध उपाययोजना राबवून महिनाभरात गावाला कोरोनामुक्त करण्यात यश मिळवले आहे.
माळूंब्रा गावाची लोकसंख्या ८०० असून, कोरोनाची पहिली व दुसरी लाट ओसरल्यावर अचानक गावात ४३ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण होते. अशास्थितीत ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी एकीचे बळ दाखवत गृहभेटी, रॅपिड टेस्ट शिबिर, फवारणी यासारख्या उपाययोजना केल्या. तसेच मास्क, सॅनिटायझरचा वापर, कुटुंबनिहाय आरोग्य तपासणी करून जनजागृती केली. यामुळे महिनाभरात कोरोना गावातून हद्दपार झाला.
मागील महिनाभरापासून गावात एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. प्रशासन व ग्रामपंचायतीने सूक्ष्म नियोजन करत गावात कन्टेनमेंट झोन तयार करण्याबरोबरच गावात फवारणी केली यासह मास्क वाटप केले. गावातील नागरिकांच्या कोरोना चाचण्या वाढवल्या. लसीकरण ही केले, त्यामुळे सध्या गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने गावाला मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी वेळोवेळी भेट देऊन सूचना केल्या होत्या.
गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे उपाययोजना...
कोरोनाची रुग्णसंख्या वाढली होती. अशावेळी गावकऱ्यांनी शासन नियमांचे पालन करीत सहकार्य केले. गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबवून जनजागृती करण्यात आली. त्यामुळे कोरोना रुग्ण कमी झाले. यापुढेही ग्रामस्थांनी शासन नियमांचे काटेकारेपणे पालन करावे. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होईल.
- शकुंतला कदम, सरपंच