क्रीडा स्पर्धेविना सरत्या वर्षात खेळाडूंसह मैदाने राहिली शांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST2020-12-29T04:19:15+5:302020-12-29T04:19:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : २०- २० म्हटले की क्रिकेट आठवते. मात्र, २०- २० हा आकडा कोरोनामुळे प्रत्येकाच्या स्मरणात ...

क्रीडा स्पर्धेविना सरत्या वर्षात खेळाडूंसह मैदाने राहिली शांत
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : २०- २० म्हटले की क्रिकेट आठवते. मात्र, २०- २० हा आकडा कोरोनामुळे प्रत्येकाच्या स्मरणात राहिला. त्याचे कारण २०२० हे वर्ष. या वर्षात कोरोनाने अनेक घडामोडींना ब्रेक लावला. त्यात क्रीडा क्षेत्रही सुटले नाही. सरत्या वर्षात खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची संधी मिळणाऱ्या स्पर्धेलाही मुकावे लागले. त्यामुळे खेळाडूंच्या कौशल्याला यंदाच्या वर्षात खीळ बसली.
वर्षभर सराव करून खेळाडू स्पर्धेची तयारी करीत असतात. स्पर्धेत चमकदार कामगिरी करून पुढील स्पर्धेसाठी वर्णी लावण्यासाठी ते धडपडत असतात. शालेय, विद्यापीठ व संघटनेमार्फत प्रतिवर्षी तालुका ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होत असतात. मात्र, यंदाच्या वर्षात कोरोनाने यावर पाणी फेरले. स्पर्धा तर दूरच खेळाडूंच्या सरावालाही लॉकडाऊनने कुलूप घातले होते. त्यामुळे शारीरिक कसरती करत खेळाडूंनी जवळपास ४ महिने घरीच सराव केला. घरातील अंगण, गच्चीवरील टेरेसचा आधार घेत खेळाडूंनी शारीरिक तंदुरुस्तीवर भर दिला. त्यामुळे मैदानावरील कौशल्याच्या सरावाला खेळाडू मुकले.
त्यातच यंदाच्या वर्षात ना शालेय स्पर्धा, ना विद्यापीठ स्पर्धा, ना संघटनेमार्फत आयोजित स्पर्धा. त्यामुळे खेळाडूंची हिरमोड झाला. मात्र, हार मानतील ते खेळाडू कसले. स्पर्धा नसली तरी खेळाडूंनी लॉकडाऊननंतर सरावाला नव्या जोमाने सुरुवात करीत आपली लय कायम राखली. आगामी वर्षात याची उणीव भरून काढून चमकदार कामगिरी करू, अशी चंग बांधली. एकंदरीत कोरोना काळात क्रीडा क्षेत्रावर झालेली हानी खेळाडू विसरणार नाहीत. शालेय स्पर्धेत अनुदानित खेळांची संख्या ४२ आहे. तर विनाअनुदानित खेळांची संख्या ३० च्या आसपास आहे. विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरही ३५ खेळांच्या स्पर्धा प्रतिवर्षी होतात. यासह संघटनेमार्फत जवळपास १०० खेळांच्या स्पर्धा होत असतात. मात्र, यंदाच्या वर्षात या संपूर्ण स्पर्धेला कोरोनाने ब्रेक लावला आहे. त्यामुळे लातूरच्या क्रीडा क्षेत्रात नाराजीचा सूर उमटला. नेहमी गजबजणारे क्रीडा संकुल मैदान सरत्या वर्षात लॉकडाऊनमध्ये ठप्प होते.
लॉकडाऊन काळात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनाही पोलिसांचा दंडुका खावा लागला. त्यामुळे यंदाचे वर्ष व्यायाम करणाऱ्यांना चांगलेच आठवणीत राहील. कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी झोपणारे अनेक जण या वर्षात व्यायामाला लागले.
टर्फ विकेटवर सामना खेळण्याची संधी...
दयानंद शिक्षण संस्थेच्या मैदानावर नव्याने झालेल्या क्रिकेट मैदानामुळे लातूरच्या खेळाडूंना टर्फ विकेटवर खेळण्याची नामी संधी यंदाच्या वर्षात प्राप्त झाली. या ग्रीन टॉप मैदानावर फटकावलेला चेंडू डाय मारून अडविण्याचे स्वप्नही सरत्या वर्षात लातूरच्या क्रिकेटपटूंचे साकार झाले. एकंदरीत लातूरच्या क्रिकेट विश्वात या मैदानामुळे वैभव प्राप्त झाले.
खुल्या स्पर्धेतून खेळाडूंनी दाखविली चमक...
शालेय विद्यापीठ तथा संघटना स्तरावरील स्पर्धा जरी यंदाच्या वर्षात झाल्या नसल्या तरी अनेक खेळांच्या खुल्या स्पर्धा लॉकडाऊन नंतर सुरू झाल्या. त्यामुळे खेळाडूंच्या बंद असलेल्या कौशल्याला चालना मिळाली. विविध बक्षीस रूपी स्पर्धेतील खेळाडूंनी या काळात बंद असलेली आर्थिक नाडी पुन्हा चालू केली. व्हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो- खो सह अनेक खेळांच्या स्पर्धा खुल्या रूपाने झाल्याने स्पर्धेतील खेळाडूंचा जोश पुन्हा पाहावयास मिळाला.