औसा तालुक्यातील किल्लारी हे शहरवजा गाव आहे. गावची लोकसंख्या जवळपास ३० हजार आहे. गावात मोठी बाजारपेठ, आडत बाजार, बँका, शाळा, महाविद्यालये, ग्रामीण रुग्णालय आहे. त्यामुळे किल्लारीशी दररोज ४० पेक्षा अधिक गावांतील नागरिकांचा संपर्क असतो. गावच्या पाणीपुरवठ्यासाठी शासनाने माकणी प्रकल्पावरून ३० खेडी पाणीपुरवठा योजना राबविली आहे. परंतु, जलवाहिनीस बरीच वर्षे झाल्याने आणि ती चांगल्या दर्जाची नसल्याने सतत फुटत असते. त्याचबरोबर सतत विद्युत मोटार जळण्याचे प्रमाणही आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना सतत पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
काही दिवसांपूर्वी किल्लारीस पाणीपुरवठा करणाऱ्या माळकोंडजी येथील जलकुंभाच्या जलवाहिनीला ४० टक्के गळती लागली होती. त्यामुळे बरेच दिवस दुरुस्तीसाठी लागले. त्यांन दोनच दिवस गावांत पाणी आले. गावातील काही गल्लीत पाणी पोहोचले तर काही गल्लीत पोहोचले नाही. दरम्यान, ‘महावितरण’ने थकीत वीजबिलापोटी २४ फेब्रुवारीला वीजपुरवठा तोडला. परिणामी, गावातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू झाले.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे; परंतु, किल्लारी येथे पाण्याची समस्या असल्याने पाणी असलेल्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी...
सध्या किल्लारीत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ‘महावितरण’ने थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा तोडल्याने प्रकल्पात पाणी असूनही गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पालकमंत्री अमित देशमुख यांनी याकडे लक्ष देऊन ‘महावितरण’ला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
१२५ रुपयांस ५०० लिटर पाणी...
गावात पाण्याची समस्या असल्याने नागरिकांना १२५ रुपयांना ५०० लिटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. अनेकदा पाण्यासाठी आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पाण्यासाठी गोरगरिब नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.
पाणीपट्टी वसुलीची अडचण...
गावातील नागरिक पाण्यासाठी फिरत आहेत. सध्या पाणीपट्टी वसुलीवर भर देण्यात येत आहे; परंतु, कोरोनाच्या संकटामुळे हाताला काम नसल्याने नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.
- शैलाताई लोव्हार, सरपंच
वीजपुरवठा सुरळीत होणे गरजेचे...
‘महावितरण’ने वीजपुरवठा जोडल्यास तात्काळ पाणीपुरवठा करण्यात येईल. या योजनेचे बिल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरण्यात येते, असे माकणी प्रकल्पावरील अभियंता संगाप्पा कपाळे यांनी सांगितले.