शेतकरीच ठरणार सोयाबीन बियाणे उत्पादक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:11+5:302021-06-04T04:16:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित असून, ३ लाख क्विंटल ...

शेतकरीच ठरणार सोयाबीन बियाणे उत्पादक !
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित असून, ३ लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. ‘महाबीज’कडून २० हजार, विविध खासगी कंपन्यांकडून ७५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. दरम्यान, शेतकऱ्यांकडे पावणेचार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. खासगी कंपन्यांच्या बियाण्याचा दर अधिक असल्याने शेतकऱ्यांना स्वत:जवळील बियाण्याचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे बळीराजाच सोयाबीन बियाणे उत्पादक बनणार आहे.
जिल्ह्यात यंदा खरिपाचे सरासरी क्षेत्र ५ लाख ९३ हजार हेक्टर आहे. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होणार असून, ४ लाख ५० हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यापाठोपाठ तूर ९० हजार हेक्टर, मूग ११ हजार, उडीद ९ हजार, ज्वारीचा १७ हजार हेक्टरवर पेरा अपेक्षित आहे. गेल्यावर्षी निकृष्ट बियाणे, अधिक पावसामुळे सोयाबीनला फटका बसला. त्यामुळे आगामी खरिपासाठी सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा जाणवणार, हे लक्षात घेऊन कृषी विभागाने गावोगावी जनजागृती करुन बीज प्रक्रिया मोहीम राबविण्यास सुरुवात केली.
खरिपासाठी जिल्ह्याला ३ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता आहे. ‘महाबीज’कडून केवळ २० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. त्यातील ४ हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येणार आहे. उर्वरित १६ हजार क्विंटलमधील बियाणे मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत तर हे बियाणे विक्री झाल्याचा कृषी विभागाचा दावा आहे. विविध खासगी कंपन्यांचे ७५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तसेच कृषी विभागाच्या जनजागृतीमुळे शेतकऱ्यांकडे ३ लाख ७५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता गावातील शेतकरी अथवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बियाण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही.
बियाण्याच्या पोत्यामागे एक हजाराचा फरक...
‘महाबीज’चे बियाणे हे भरवशाचे गृहित धरले जाते. त्यातच महाबीज आणि खासगी कंपन्यांच्या बियाण्याच्या एका पोत्यामागे जवळपास एक हजार रुपयांचा फरक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गावातील उगवण क्षमता चांगल्या असलेल्या शेतकऱ्यांजवळील बियाणे वापरणे गरजेचे ठरत आहे. त्यातून दोन्ही शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांकडील बियाण्याचा वापर करावा...
एकदा सुधारित सोयाबीन बियाणे वापरल्यानंतर आलेल्या उत्पन्नातून पुढील तीन वर्षे तेच बियाणे वापरता येते. महाबीज बियाण्याला अधिक मागणी आहे. परंतु, ते यंदा कमी प्रमाणात उपलब्ध झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासून शेतकरी अथवा शेतकरी उत्पादक कंपनीकडील बियाणे वापरल्यास अधिक फायदेशीर ठरेल.
- दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
घरचे बियाणे वापरावे...
शेतकऱ्यांनी खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्याऐवजी आपल्या गावातील शेतकऱ्यांकडील बियाण्याचा वापर करावा. त्यापूर्वी उगवण क्षमता तपासावी. त्यामुळे बियाणे न उगवण्याची भीती राहणार नाही. कमी दरात चांगले बियाणे मिळेल. त्यासाठी गेल्या ६ महिन्यांपासून जनजागृती करुन प्रबोधन केले जात आहे.
- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.