आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:19 IST2021-04-02T04:19:17+5:302021-04-02T04:19:17+5:30
नागरसोगा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत. दरम्यान, या भागातील छोट्या-मोठ्या व्यवसायांना खीळ ...

आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकरी अडचणीत
नागरसोगा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत. दरम्यान, या भागातील छोट्या-मोठ्या व्यवसायांना खीळ बसली आहे. आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांपुढे भाजीपाला विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण संकटात सापडले आहे.
गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट सुरू झाले आहे. मध्यंतरीच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. मात्र, आता गत महिन्यापासून पुन्हा संसर्ग वाढू लागला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत. सध्या हॉटेल, पानटपरी चालकांना व्यवसाय करणाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर आठवडी बाजारही बंद करण्यात आले आहेत. नागरसोगा, दापेगाव, हारेगाव, जवळगा, तुंगी, गाढवेवाडी, गुबाळ, औसा, चिंचोली परिसरातील छोटे- मोठे व्यावसायिक, शेतकरी, भाजीपाला उत्पादक हे आठवडी बाजारात भाजीपाल्याची तसेच अन्य साहित्याची खरेदी-विक्री करीत असतात. मात्र, आठवडी बाजार बंद पडल्याने हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
औसा तालुक्यातील नागरसोगा व परिसरातील दापेगाव, जवळगा, गाढवेवाडी येथील असंघटित क्षेत्रातील कुशल कामगार औसा, लातूर अशा शहरात जाऊन बांधकामावर मजुरी करतात. त्यावर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह असतो. मात्र, आता हाताला काम नसल्याने मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे शेतकऱ्यांसह मजूरही संकटात सापडले असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनाने योग्य नियोजन करावे...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन नियम अधिक कडक करून अंमलबजावणी करीत आहे. मात्र, त्याचा छोट्या व्यावसायिकांना फटका बसत आहे. आम्ही खरेदी केलेला कच्चा माल घरातच पडून आहे. त्यामुळे भांडवलही गुंतले आहे. परिणामी, आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी येथील व्यापारी परमेश्वर कोळी यांनी केली.
डिझेलचा खर्चही निघेना...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रवासी वाहतुकीला मर्यादा घालण्यात आली आहे. त्यातून डिझेलचा खर्चही निघत नाही. बँकेचा हप्ता वेळेवर भरता येत नाही. कुठे मजुरी करावी म्हटले तर हाताला काम मिळत नाही. प्रशासनाने यातून मार्ग काढावा, अशी मागणी वाहन चालक मुक्तार शेख यांनी केली.