शेतकऱ्यांची यंदा घरगुती सोयाबीन बियाणांवर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST2021-05-05T04:32:08+5:302021-05-05T04:32:08+5:30

खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकरी आता हंगामपूर्व मशागतीची कामे आटोपत आहेत. दरम्यान, कृषी विभागाकडून पूर्वतयारी बैठकही घेण्यात आली ...

Farmers rely on home-grown soybean seeds this year | शेतकऱ्यांची यंदा घरगुती सोयाबीन बियाणांवर मदार

शेतकऱ्यांची यंदा घरगुती सोयाबीन बियाणांवर मदार

खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकरी आता हंगामपूर्व मशागतीची कामे आटोपत आहेत. दरम्यान, कृषी विभागाकडून पूर्वतयारी बैठकही घेण्यात आली आहे. तालुक्यात ७७ हजार २३० हेक्टर शेती असून, त्यात पेरणीयोग्य क्षेत्र ७१ हजार ९९३ हेक्टर आहे. त्यातील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर म्हणजे ३८ हजार ८४९ हेक्‍टरवर सोयाबीनचा पेरा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी २९ हजार ५०० क्विंटल सोयाबीन बियाणांची आवश्यकता आहे.

जानेवारीत तालुक्यात ४३ हजार ५०० क्विंटल बियाणे होते. म्हणजे १४ हजार ५०० क्विंटल बियाणे अधिक शिल्लक होते. सदर बियाणे हे शेतकऱ्यांकडे होते. मात्र, मध्यंतरी सोयाबीनचे दर ७ हजारांच्या पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांनी जवळपास ५० टक्के सोयाबीन विक्री केले. त्यामुळे आगामी हंगामात सोयाबीन बियाणांची टंचाई होण्याची शक्यता आहे.

महाबीज केवळ ३० टक्के सोयाबीन बियाणे पुरविते. उर्वरित ७० टक्के बियाणे इतर कंपन्या पुरवितात. मात्र, मागील वर्षी सोयाबीन बियाणे न उगवल्याने राज्य शासनाने खटले दाखल केले. त्यामुळे मध्यप्रदेशसह अन्य ठिकाणच्या कंपन्यांनी महाराष्ट्रात सोयाबीन बियाणे विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका आगामी हंगामात बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे तयार ठेवावे. त्यातील काडीकचरा साफ करावा. त्याचबरोबर त्याची उगवण क्षमता तपासावी. त्यासाठी कृषी सहायकाची मदत घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सद्य:स्थितीत तूर पिकासाठी ११ हजार ९०४ हेक्टर, कापूस ६ हजार ५२५ हेक्टरवर लागवड होण्याची शक्यता आहे, तसेच उसाची ६ हजार ८०६ हेक्टरवर लागवड होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील सहा मंडळांमध्ये सोयाबीनचा तुटवडा होऊ नये म्हणून कृषी विभागाकडून नियोजन करणे सुरू आहे.

उगवण क्षमता तपासावी...

बहुतांश शेतकऱ्यांनी जास्त दरामुळे सोयाबीनची विक्री केली आहे. मात्र, बियाणांचा भाव हा विक्रीपेक्षा दीडपट जास्त असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःजवळील घरगुती बियाणे तीनदा तपासून घ्यावे, तसेच उगवण क्षमता तपासून घ्यावी. त्यासाठी कृषी विभाग मदत करणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी बी.आर. पवार यांनी सांगितले.

Web Title: Farmers rely on home-grown soybean seeds this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.