पीक विमा भरण्यास शेतकरी निरुत्साही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST2021-07-12T04:13:43+5:302021-07-12T04:13:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चापोली : गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, पीक संरक्षणापोटी ...

पीक विमा भरण्यास शेतकरी निरुत्साही
लोकमत न्यूज नेटवर्क
चापोली : गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, पीक संरक्षणापोटी भरलेला पीक विमा हा चापोली परिसरासाठी मंजूर झाला नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पीक संरक्षणासाठी चार दिवस शिल्लक राहिले असतानाही शेतकरी पीक विमा हप्ता भरण्याबाबत उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या संरक्षणासाठी चापोलीसह परिसरातील शंकरवाडी, ब्रम्हवाडी, आनंदवाडी, नायगाव, अजनसोंडा (बु.), येणगेवाडी, धनगरवाडी, हिप्पळनेर येथील शेतकऱ्यांनी सहभागी होत विमा हप्ता भरला होता. खरिपातील पीक काढणीच्या अवस्थेत असताना अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनामार्फत नुकसानाचे पंचनामेही झाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी नुकसानाचे अर्ज कृषी विभागाकडे जमा केले होते. अंतिम पैसेवारीही ५० पैशांच्या आत होती. त्यामुळे पीक विमा मिळेल, अशी आशा होती. मात्र, पीक विमा कंपनीने ऐनवेळी काही अटी व नियम लावत वगळले. गतवर्षीच्या पीक विम्याचा परतावा न मिळाल्याने यंदा शेतकरी पीक विमा भरण्यास अनुत्साही दिसत आहेत.
यावर्षी चापोली परिसरात खरिपाचा ९८ टक्के पेरा झाला आहे. कोवळी पिके वाढीच्या अवस्थेत असताना पावसाने उघडीप दिली होती. अशा परिस्थितीत पीक विमा काढून पीक संरक्षित करून घेणे गरजेचे आहे. परंतु, मागील वर्षीचा पीक विमा न मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांत संभ्रम दिसून येत आहे. विमा भरण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत आहे. मात्र, शेतकरी उत्साही नसल्याचे दिसून येत आहे.
बँकेने विम्याचा भरणा करावा...
गतवर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांची स्थिती हालाखीची आहे. उसनवारी व खासगी सावकारांचे कर्ज काढून पेरण्या केल्या. ज्या शेतकऱ्यांनी बँकेचे पीक कर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा हप्ता सोसायटीमार्फत बँकेने भरावा, अशी मागणी होत आहे.
पीकविम्याचा लाभ द्यावा...
शासनाने पीक विमा देऊन मदत करावी. गेल्यावर्षी ऐन काढणीच्या काळात अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामेही केले. त्यामुळे पीक विमा मंजूर होईल, अशी आशा होती. परंतु, एकाही शेतकऱ्याला विमा मिळाला नाही. पीक विम्याचा लाभ द्यावा.
- गंगाधर बावगे, शेतकरी, चापोली.
पीक विम्याबाबतीत द्विधा मन:स्थिती...
गतवर्षी सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी पंचनाम्यासाठी बांधावर आला नाही. त्यामुळे यंदा विमा काढावा की नाही, अशी द्विधा मन:स्थिती आहे.
- बस्वराज मुर्गे, शेतकरी, चापोली.
उडवाउडवीची उत्तरे...
पीक विमा कंपनीने रॅन्डम प्लॉट पाडून सोयाबीन उत्पन्न जास्त झाल्याचे सांगून विमा नाकारला. या प्लॉटची यादी कंपनीकडे मागितली, तर उडवाउडवीची उत्तरे मिळाली. विमा अद्यापही मिळाला नाही.
- रमेश पाटील, चापोली.