शेतकऱ्यांना २० वर्षांपासून पाझर तलावाच्या मावेजाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST2021-09-15T04:24:31+5:302021-09-15T04:24:31+5:30

शिरूर अनंतपाळ : येथील शेतकऱ्यांना गेल्या २० वर्षांपासून पाझर तलावात गेलेल्या जमिनीच्या मावेजाची प्रतीक्षा लागली आहे. मावेजा मिळण्यासाठी आणखी ...

Farmers have been waiting for 20 years for the passage of the lake | शेतकऱ्यांना २० वर्षांपासून पाझर तलावाच्या मावेजाची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना २० वर्षांपासून पाझर तलावाच्या मावेजाची प्रतीक्षा

शिरूर अनंतपाळ : येथील शेतकऱ्यांना गेल्या २० वर्षांपासून पाझर तलावात गेलेल्या जमिनीच्या मावेजाची प्रतीक्षा लागली आहे. मावेजा मिळण्यासाठी आणखी किती पिढ्यांना प्रतीक्षा करावी लागेल, असा सवाल शेतकऱ्यांमधून केला जात आहे. या पाझर तलावाने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत असून, एकीकडे मावेजा मिळत नाही, तर दुसरीकडे पाझर तलाव फुटून दरवर्षी पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मावेजा मिळाला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

शिरूर अनंतपाळ येथील पाझर तलाव क्रमांक ३ चे काम होऊन जवळपास २० वर्षे उलटली आहेत. तरीही या पाझर तलावात गेलेल्या जमिनीचा शासनाच्या नियमाप्रमाणे मिळणारा मावेजा मिळाला नाही. या पाझर तलावाचा फायदा कमी आणि नुकसानच जास्त, असा प्रकार या पाझर तलावामुळे निर्माण झाला आहे. एकीकडे जमिनीचा मावेजा नाही आणि दुसरीकडे पाझर तलाव फुटून प्रत्येकवर्षी उर्वरित जमिनीचे नुकसान होत आहे. त्यामुळे आगामी काळात मावेजा देण्यात यावा, तसेच पाझर तलाव फुटून झालेल्या पिकाचे नुकसान, तसेच जमिनीच्या खरडनचे पंचनामे करून तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

पाझर तलाव क्रमांक ३ च्या निर्मितीसाठी सर्व्हे नंबर १११ मधील पाच शेतकऱ्यांची ३ हेक्टर्स २० गुंठे जमीन संपादित करण्यात आली होती. यामध्ये कमलाकर गोपाळ बनकर, शिवनंदा सुखदेव बाबर, राजेंद्र दशरथ बनकर, नागनाथ दशरथ बनकर, लक्ष्मण दशरथ बनकर यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना २० वर्षांपासून मावेजाची प्रतीक्षा लागली आहे.

पाठपुरावा करूनही मावेजा नाही...

शिरूर अनंतपाळच्या पाझर तलाव क्रमांक ३ साठी ५ शेतकऱ्यांचे भूसंपादन केले. त्यास आता जवळपास २० वर्षे उलटली आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत एका पिढीने पाठपुरावा केला, परंतु मावेजा मिळाला नाही. आता आणखी किती पिढ्यांना मावेजासाठी प्रतीक्षा करावी लागेल, असा सवाल शेतकरी बनकर यांनी केला आहे.

Web Title: Farmers have been waiting for 20 years for the passage of the lake