भाजीपाल्यास भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:21+5:302021-06-04T04:16:21+5:30
व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे लागवडीचा खर्चही पदरी पडेनासा झाला असल्याचे ...

भाजीपाल्यास भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत
व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे लागवडीचा खर्चही पदरी पडेनासा झाला असल्याचे दिसून येत आहे.
काेरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने बाजारपेठा बंद राहिल्या. सकाळच्या वेळी अत्यावश्यक सेवा सुरु असल्या तरी त्या वेळेपर्यंत भाजीपाला उत्पादकांना आपला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणता आला नाही. दरम्यान, काही विक्रेत्यांनी कमी दराने भाजीपाला खरेदी करुन बाजारपेठेत विक्री करीत आहेत. किल्लारी हे जवळपास ३० हजार लोकसंख्येचे गाव आहे. त्यामुळे मोठी बाजारपेठ आहे. परिसरातील जवळपास ४० गावातील नागरिक येथे विविध खरेदीसाठी येतात.
कोरोनाच्या संकटामुळे भाजीपाल्यास मागणी नसल्याने शेतकरी मिळेल त्या दराने भाजीपाल्याची ठोक विक्री करीत आहेत. मात्र, व्यापाऱ्यांकडून दर कमी मिळत असल्याने काही शेतकऱ्यांनी भाजीपाला बांधावर टाकला. भाजीपाला लागवडीसाठीचा खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही, असे शेतकरी सुनील चेळकर, नवनाथ चेळकर, ज्ञानेश्वर परसाळगे, आबा हांडे, विक्रम भोसले, श्रीहरी हांडे, नेताजी साखरे, संग्राम भोसले यांनी सांगितले.