भाजीपाला पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:20 IST2021-04-21T04:20:30+5:302021-04-21T04:20:30+5:30
मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात घट लातूर : जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि साठवण तलावातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. ...

भाजीपाला पडून
मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात घट
लातूर : जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि साठवण तलावातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवन वाढले आहे. यातून दिवसेंदिवस पाणीपातळी घसरत चालली आहे. तेरणा नदीवरील काही बंधारे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरडे पडले आहेत. तर काही ठिकाणचे पाझर तलावही कोरडे पडले आहेत.
उन्हाची तीव्रता वाढली; नागरिक हैराण
लातूर : शहरासह जिल्हाभरात गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला आहे. परिणामी, सकाळी १०.३० वाजेपासूनच उन्हाचे चटके जाणवायला लागले आहेत. सायंकाळी ६ नंतर उन्हाची तीव्रता कमी होत आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत उकाडा जाणवत आहे. यातून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या वृक्षांच्या सावलीचा आधार घेतला जात आहे. तर काही ठिकाणी फॅन, कुलरचा वापर वाढला आहे. दुपारच्या वेळी सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
लातूर : शहर आणि जिल्हाभरात ठिकठिकाणी विनामास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर स्थानिक प्रशासन आणि पोलीस पथकाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी या नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहनही वारंवार जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र काही हौशी मंडळी विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे आढळून आले आहे. अशा नागरिकांवर आता पोलीस आणि प्रशासनाची नजर आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड आकारला जात आहे. शिवाय, रात्रीच्या संचारबंदीच्या काळात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. या वाहनांची नोंदही ठेवली जात आहे.
विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई
लातूर : शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरोना नियमांचे उल्लंघन करीत पहाटेच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. एकूण ४१ नागरिकांवर गेल्या दोन दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली. त्यांना पोलीस ठाण्यात आणून कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये दोघेजण बाधित असल्याचे आढळून आले. त्यांना तातडीने कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक विकास तिडके यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे काम सुरूच राहणार आहे.