कोरोना महामारीवर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा ! दरही वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST2021-04-07T04:20:35+5:302021-04-07T04:20:35+5:30
लातूर : उन्हाच्या तीव्रतेमुळे प्रत्येकजण हैराण झाला असून, त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याला उतारा म्हणून मोसंबी, संत्री आणि ...

कोरोना महामारीवर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा ! दरही वाढले
लातूर : उन्हाच्या तीव्रतेमुळे प्रत्येकजण हैराण झाला असून, त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याला उतारा म्हणून मोसंबी, संत्री आणि लिंबाला बाजारात मागणी वाढली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या तिन्ही फळांची बाजारातील आवक घटली आहे.
जानेवारी महिन्यामध्ये मोसंबीचा किरकोळ विक्रेत्यांकडे ८० रुपये किलो दर होता, तर आता एप्रिल महिन्यात १४० रुपये किलोवर पोहोचला आहे. संत्रीचाही भाव जानेवारी महिन्यात ४० रुपये होता, आता १२० रुपयांवर हा दर गेला आहे. अनेक जण कोरोनावर उतारा म्हणून लिंबू, मोसंबी, संत्रीचा वापर आहारामध्ये करीत आहेत. त्यामुळे बाजारात या तिन्ही फळांना मागणी वाढली आहे; परंतु नागपूरच्या मोसंबीची आवकच घटली आहे. आता सध्या राजस्थानमधील मोसंबी बाजारात थोड्या प्रमाणातच उपलब्ध आहे.
अमरावती, नागपूर भागातून संत्री, मोसंबीची आवक डिसेंबर महिन्यामध्ये होते. ती आवक घटल्यामुळे दर वाढले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात २५ रुपये किलो संत्री तर ३५ रुपये किलो मोसंबी होती. त्यात आता ४० टक्के वाढ झाली आहे. नागपूरची संत्री तर मोसंबी आणि लिंबू लातूर जिल्हा व परिसरातीलच बाजारात उपलब्ध असून, व्यापारी मुंबई, हैदराबाद आदी भागांतून सदर फळे उपलब्ध करण्याकडे लक्ष केंद्रित करीत आहेत. मागणी वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी अन्य कुठल्या भागातून मोसंबी, संत्री मिळते यासाठी कानोसा घेताहेत.