लातूर : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून इच्छुकांनी कंबर कसली आहे. पहिल्या दोन दिवसांतच नामनिर्देशन पत्रांच्या विक्रीचा आकडा पाहता, यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. एकूणच मनपा निवडणुकीच्या मैदानात 'भावी' नगरसेवकांची भाऊगर्दी वाढली असल्याचे दिसत आहे.
निवडणुकीसाठी अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी १४४ इच्छुकांनी अर्ज नेले होते, तर दुसऱ्या दिवशी ही संख्या ३६९ वर पोहोचली आहे. दोन दिवसांत एकूण ५१३ अर्जांची विक्री झाली असून, 'एक जागा आणि अनेक दावेदार' असे चित्र सध्या लातूरमध्ये पाहायला मिळत आहे.
बंडखोरीचे सावट; उमेदवारीचा 'सस्पेन्स'..!विजयाची खात्री असलेल्या पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी ओढाताण सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत आहे. अनेक कार्यकर्त्यांनी सोयीनुसार पक्ष बदलले असून, उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. हेच ओळखून सर्वच मोठ्या पक्षांनी उमेदवारीचा 'सस्पेन्स' कायम ठेवला आहे.
'शब्द' मिळालाय! प्रचाराचा धडाका सुरू..!उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत ३० डिसेंबर असली, तरी अनेक इच्छुकांनी आतापासूनच गल्लीबोळात प्रचाराचा धडाका लावला आहे. काँग्रेस आणि भाजपमधील इच्छुक सध्या आघाडीवर आहेत. मला पक्षाने शब्द दिला आहे, मीच उमेदवार असणार, असे सांगत इच्छुक मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. सकाळ-संध्याकाळ कोपरा सभा आणि घरोघरी जाऊन आशीर्वाद घेण्याचे सत्र सुरू झाले आहे.
जागावाटपाची चर्चा : भाजप ४८ आणि राष्ट्रवादी २२?महायुतीमध्ये जागावाटपाचे वारे जोरात वाहत आहेत. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात जागावाटपाचे सूत्र ठरल्याचे समजते. यात भाजप ४८ तर राष्ट्रवादी २२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची दाट चर्चा आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
महाविकास आघाडीतही बैठकांचे सत्र...दुसरीकडे, काँग्रेस आणि उद्धवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांमध्येही महत्त्वाची बैठक पार पडली आहे. जागा वाटपाचे सूत्र ठरले असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी (शरद पवार), शिंदेसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी अद्याप पत्ते उघड केलेले नाहीत. सर्वच पक्षांच्या अंतर्गत बैठकांचे सत्र सुरू असून, ३० डिसेंबरनंतरच खऱ्या अर्थाने लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
महत्त्वाचे टप्पे :३० डिसेंबर : अर्ज भरण्याची शेवटची मुदत.३१ डिसेंबर : अर्जांची छाननी.२ जानेवारी : अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
Web Summary : Latur's municipal election heats up. Many aspirants vie for candidacy, causing internal party tensions and potential defections. Intense campaigning underway despite seat-sharing suspense among major alliances.
Web Summary : लातूर नगर पालिका चुनाव में गर्मी बढ़ी। कई उम्मीदवार उम्मीदवारी के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं, जिससे पार्टी के भीतर तनाव और संभावित दलबदल हो रहा है। प्रमुख गठबंधनों के बीच सीट बंटवारे के सस्पेंस के बावजूद जोरदार प्रचार जारी है।