बियाणे, खत विक्रीवर नियंत्रणासाठी तालुकास्तरावर भरारी पथके स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:19 IST2021-04-22T04:19:24+5:302021-04-22T04:19:24+5:30
सध्या जिल्ह्यातील शेतकरी आगामी खरीप हंगामाची तयारी करीत आहेत. शेतीकामे आटोपण्यावर भर दिसून येत आहे. दरम्यान, बियाणे, खते व ...

बियाणे, खत विक्रीवर नियंत्रणासाठी तालुकास्तरावर भरारी पथके स्थापन
सध्या जिल्ह्यातील शेतकरी आगामी खरीप हंगामाची तयारी करीत आहेत. शेतीकामे आटोपण्यावर भर दिसून येत आहे. दरम्यान, बियाणे, खते व कीटकनाशकांबाबत शेतकरी तसेच कृषी सेवा केंद्र चालकांना विविध अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत कमी असल्याने शेतकरी, कृषी दुकानदारांच्या अडचणी व तक्रारींचे वेळेत निवारण होणे आवश्यक आहे.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे टाळेबंदीच्या अनुषंगाने बियाणे, खते व कीटकनाशकांचे उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक, वितरण व विक्री करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीत सदर निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी तसेच त्यांचे उत्पादन व वितरण नियंत्रित करणे आवश्यक आहे. बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
साठेबाजी करणाऱ्यांवर कार्यवाही...
खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशकांची साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हास्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा भरारी पथक तयार करण्यात आले आहे. तसेच तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली तालुका भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशकांची गुणवत्ता व पुरवठ्यासंदर्भात कुठलीही अडचण आल्यास भ्रमणध्वनी, ईमेल, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाणे व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले आहे.