लातूर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायती हद्दीत शनिवारपासून पानटपऱ्या, चहाच्या टपऱ्या, खेळाची मैदाने, जीम, व्यायामशाळा, स्वीमिंग पूल, पार्क, पर्यटनस्थळे, करमणुकीची ठिकाणे, मंगल कार्यालये, सभागृह, नाट्यगृह, चित्रपटगृहे बंद राहणार आहेत. ४ एप्रिलपर्यंत सदर निर्बंध राहणार आहेत.
सर्वप्रकारचे हॉटेल्स, परमिट रुम, रेस्टॉरंट या ठिकाणी बसून खाण्या-पिण्यास मनाई आहे. परंतु, पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. तर २९ रोजी साजरी होणारी होळी, धुलिवंदन आणि २ एप्रिल रोजी साजरी होणारी रंगपंचमी प्रतिकात्मक पद्धतीने आपल्या कुटुंबात घरीच साजरी करण्याचे निर्देश आहेत. ऑटोरिक्षा प्रवासी संख्येची मर्यादा वाहन चालक २ तसेच अधिकृत खाजगी टॅक्सी काळी-पिवळीसाठी वाहनचालक ५ इतकी मर्यादा असेल. खाजगी बसेस, सिटी बस, एस.टी. मध्ये नो मास्क-नो एन्ट्री नियमाच्या पालनासह सिटींग क्षमतेएवढे प्रवासी प्रवास करू शकतील. कोणत्याही परिस्थितीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध दंडात्मक व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९९ अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ तसेच कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट, बारमधून पार्सल सेवाहॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रुम व बारमध्ये बसून खाण्या-पिण्यास मनाई आहे. मात्र पार्सल सेवा सुरू राहील. पानटपऱ्या, चहाच्या टपऱ्या पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहेत.