हंडरगुळीतील बालोद्यानाच्या जागेवरील अतिक्रमण निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:20 IST2021-03-05T04:20:09+5:302021-03-05T04:20:09+5:30
हंडरगुळी येथे नांदेड- बीदर राज्य मार्गालगत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अनेक वर्षांपासून आहे. पुतळ्याशेजारी राज्य मार्गालगत गायरान ...

हंडरगुळीतील बालोद्यानाच्या जागेवरील अतिक्रमण निघणार
हंडरगुळी येथे नांदेड- बीदर राज्य मार्गालगत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अनेक वर्षांपासून आहे. पुतळ्याशेजारी राज्य मार्गालगत गायरान जमीन आहे. ही जमीन बालोद्यानासाठी असल्याचे सांगितले जाते. मात्र, गावातील काहींनी सदरील जमिनीवर अतिक्रमण करून जागेची खरेदी- विक्री करून ग्रामपंचायतीला नोंद करीत मालकी हक्क दाखवला. दरम्यान, ही बाब निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. या मालकीच्या जागेचा नमुना नं ८ रद्द करण्याची मागणी एन. डी. मसुरे, इतिहास कांबळे, दयानंद कांबळे आदींनी केली. त्याची दखल घेऊन गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी गुरुवारी हंडरगुळी ग्रामपंचायतीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. निवेदनातील मागणीनुसार सर्व्हे नं. ६८ मधील अतिक्रमित व्यक्तींच्या मालकी व भोगवाटा नमुना नं. ८ मधील पाच व्यक्तींच्या नोंदी रद्द करण्याचे लेखी आदेश ग्रामपंचायतीला दिले.
९ मार्च रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत याबाबत ठराव घेऊन सदरच्या नोंदी रद्द करण्यात येतील, असे ग्रामविकास अधिकारी एस. आर. कांबळे यांनी सांगितले.