अहमदपूर शहरातील २२ दुकानांवर अतिक्रमण पथकाचा ‘हाताेडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST2021-03-10T04:20:42+5:302021-03-10T04:20:42+5:30
अहमदपूर शहरातील मुख्य बाजारपेठेलगत असलेल्या तहसील कार्यालयाच्या पाठीमागील परिसरात सर्वे नंबर ३९ मध्ये २२ दुकाने गत ३० वर्षांपूर्वी ...

अहमदपूर शहरातील २२ दुकानांवर अतिक्रमण पथकाचा ‘हाताेडा’
अहमदपूर शहरातील मुख्य बाजारपेठेलगत असलेल्या तहसील कार्यालयाच्या पाठीमागील परिसरात सर्वे नंबर ३९ मध्ये २२ दुकाने गत ३० वर्षांपूर्वी ११ महिन्यांच्या भाडेतत्त्वावर संबंधित व्यावसायिकांना देण्यात आली हाेती. मात्र, दुकानदाराना वारंवार सूचना देऊन ते आपले दुकान रिकामे करत नव्हते. न्यायालयाच्या आदेशानुसार सदरील दुकानांची मालकी अहमदपूर नगरपरिषदेची आहे. यासाठी सहा महिन्यांपूर्वी नगरपरिषदेच्या वतीने संबंधित दुकानदारांना रीतसर नोटिसा बजावण्यात आल्या हाेत्या. त्यानंतरही त्यांनी आपली दुकाने साेडली नाहीत. परिणामी, मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच अहमदपूर नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जेसीबीच्या साहाय्याने सदरचे अतिक्रमण हटविले आहे. यासाठी अहमदपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, करअधीक्षक सतीश बिलापट्टे, अभियंता हावंगी ढोबळे, चंद्रकांत भदाडे यांच्यासह ३० कर्मचाऱ्यांच्या पथकाने पुढाकार घेतला. त्यासाठी पाेलीस उपनिरीक्षक एकनाथ डंख, नागोराव जाधव, पोलीस कॉन्स्टेबल रमेश आलापुरे, भरकडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी पाेलीस बंदाेबस्त ठेवला हाेता.
निधी प्राप्त होताच व्यापारी संकुल...
अहमदपूर नगरपरिषदेच्या मालकीच्या मालमत्तेवर निधी प्राप्त झाल्यानंतर तातडीने या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी करण्यात आलेल्या कारवाइत जवळपास ३० बाय ३०० मीटर जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे, असे अहमदपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे म्हणाले.
इतर अतिक्रमणावरही कारवाइ करा...
अहमदपूर शहरातील तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या दुकानांवर अतिक्रमण पथकाने कारवाई केली आहे. सदरील दुकानांची मुदत संपली असल्याने, संबंधित व्यापाऱ्यांनी स्वतः दुकाने काढण्यासाठीची प्रक्रिया मागील शुक्रवारपासून सुरू केली हाेती. मंगळवारी सामान काढून घेण्यात आले आहे. अहमदपूर शहरात विविध भागांत अतिक्रमण झाले आहे. त्यावरही नगरपरिषदेने कारवाई करत, हटवावीत, असे व्यापारी पुरुषोत्तम बाहेती माहिती म्हणाले.