‘खाकी’ची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योगा, प्राणायामावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:18 IST2021-05-22T04:18:33+5:302021-05-22T04:18:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी, कर्मचारी जीवाचे रान करून अविरत कर्तव्य बजावत ...

‘खाकी’ची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योगा, प्राणायामावर भर
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी, कर्मचारी जीवाचे रान करून अविरत कर्तव्य बजावत आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग अधिक जलद आहे. परिणामी, दुसऱ्या लाटेत अधिक पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले होते. मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योगा आणि प्राणायामावर भर दिला जात आहे.
जिल्ह्यात १९४४ पोलीस अधिकारी, कर्मचारी आहेत. यामध्ये १०९ पोलीस अधिकारी तर १८३५ पोलीस अंमलदार आहेत. यापैकी ५२ पोलीस अधिकारी, ३८२ पोलीस अंमलदार तर ५१ होमगार्डस् यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यापैकी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, सध्या आठ पोलीस अंमलदारांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लसीकरण मोहिमेवर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे आतापर्यंत १०९ पैकी १०६ पोलीस अधिकारी आणि १८३५ पैकी १६२० अंमलदारांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम, पोषक आहार
कोरोना संकटाशी दोन हात करताना पोलिसांना स्वत:सह कुटुंबाच्या आरोग्याची काळयी घ्यावी लागत आहे. त्यासाठी दररोज व्यायाम, सकस आहारासोबतच योगासन, प्राणायामाद्वारे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच ग्रीन ज्यूस, फळांचेही सेवन जास्त प्रमाणात केले जात आहे.
पोलीस कर्मचारी प्रतिक्रिया
कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता तंदुरुस्त राहण्यासाठी योगासन, प्राणायाम तसेच व्यायाम करीत आहेत. योग्य सकस आहार, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश आहे. जेवण कमी करून कडधान्य आणि फळांचा आहारात जास्त समावेश आहे. - संतोष देवडे, पोलीस कर्मचारी
तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज सकाळी प्राणायाम करीत आहे. सर्व कुटुंबासोबत योगासने करून व्यायाम करतो. सकस आहार घेत असून, जास्त सलाद आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करून ग्रीन ज्यूसचे सेवन करून प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. - पोलीस कर्मचारी
लसीकरणासाठी विशेष प्रयत्न
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी राहावे, यासाठी विविध उपक्रमांवर भर आहे. दरम्यान, लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला असून, आतापर्यंत १०६ पोलीस अधिकारी तर १६२० पोलीस अंमलदारांना लस देण्यात आली आहे. बहुतांश जणांचा दुसरा डोसही पूर्ण झाला आहे.
- निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक