खाद्यतेलाचे भाव आवाक्याबाहेर, फाेडणीला महागाईचा तडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST2021-04-06T04:18:33+5:302021-04-06T04:18:33+5:30
बेलकुंड : खाद्यतेलाच्या दरात गत दिवाळीपासून वाढ हाेत आहे. सध्याचे दर तर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने गृहिणींचे स्वयंपाकाचे बजेटही कोलमडले ...

खाद्यतेलाचे भाव आवाक्याबाहेर, फाेडणीला महागाईचा तडका
बेलकुंड : खाद्यतेलाच्या दरात गत दिवाळीपासून वाढ हाेत आहे. सध्याचे दर तर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने गृहिणींचे स्वयंपाकाचे बजेटही कोलमडले आहे. सर्वसामान्यांना आता वाढत चाललेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा सामना करावा लागणार आहे. दिनांक १ डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे.
एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढत आहेत. वाढत्या इंधन दरवाढीने सामान्यांचे जगणेच मुश्कील केले आहे. वाहतूक खर्च वाढल्याचा फटका सर्वत्र बसला आहे. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात महागाईच्या झळा सहन करण्याची वेळ सर्वांवरच आली आहे. अशास्थितीत कोरोनामुळे हातचा रोजगार गेल्याने मुंबई, पुण्यासह इतर शहरांतून अनेक कुटुंब गावाकडे परतली आहेत. यातून मिळेल ते काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यातच महागाईचा भडका उडाला आहे. १ डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या दरातही शंभर ते सव्वाशे रुपयांची वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांवर तर ‘आपली चूलच बरी’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात चहासाठीच सामान्य कुटुंब गॅसचा वापर करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, खाद्यतेलाला पर्याय नाही. स्वयंपाकासाठी खाद्यतेल आवश्यकच आहे. दसरा व दिवाळीमध्ये खाद्यतेलाचा वापर अधिक होत असल्याने त्याचे काही प्रमाणात भाव वाढणे साहजिक होते. पण अपेक्षापेक्षा अधिकच भाव वाढल्याने व्यापारी तर चकीत झाले आहेतच पण याचा सर्वात जास्त त्रास हा सर्वसामान्य कुटुंबाना होत आहे. अवकाळी पावसामुळे सोयाबीन, भुईमुगासह तेलबिया पिकांचे नुकसान झाल्याने त्याचा बाजारातील उलाढालीवर, भावावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पावसाने खरिपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला. सोयाबीन, भुईमूग ही पिके हातची गेली आहेत. सोयाबीनला फटका बसल्याने त्याचा परिणाम तेलाच्या दरावर झाला आहे. विविध प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात दिवाळीनंतर वाढ झाली आहे. ही दरवाढ कमी होण्याचे नावच घेत नसल्याचे चित्र आहे.
दसरा आणि दिवाळीपूर्वी सोयाबीनचे १ लीटर तेल ९५ रुपयांना मिळत होते, ते दिवाळीला ९८ रुपये झाले. दिवाळीनंतर दर कमी होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांसह ग्राहकांना होती. मात्र, दर तर कमी झाले नाहीत उलट आहे त्या दरात माेठी वाढ झाली. सध्या हे तेल १३५ ते १४० रुपयांना मिळत आहे.
असे आहेत प्रतिकिलाे तेलाचे दर...
सूर्यफुल १ लीटर दिवाळी आधी ११० रुपये, दिवाळीत ११० ते ११५ रुपये हाेते. सध्या १४० ते १५० रुपये आहे. पामतेल १ लीटर दिवाळीपूर्वी ८५ रुपये तर दिवाळीत ९० ते ९५ रुपये हाेते. सध्या १३० ते १३५ रुपये आहे. शेंगदाणा १ किलो दिवाळीपूर्वी १०० रुपये हाेते तर दिवाळीत १०० ते ११० रुपये झाले. सध्या १७० ते १८० रुपयांच्या घरात गेले आहे. सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या किमती कमी-अधिक झाल्या आहेत. सर्रास ग्राहकांची पामतेल आणि सोयाबीन तेलाची मागणी अधिक असते. परंतु, दिवाळीपासून दररोजच भाववाढ होत असल्याने, त्याचा परिणाम उलाढालीवर दिसून येत आहे. आजपर्यंत एवढी भाववाढ कधीच झाली नव्हती, असे बेलकुंड येथील किराणा दुकानदार विरेंद्र तोळमारे म्हणाले.
महिलांसमाेर काटकसर हाच पर्याय...
दिवाळीत खाद्यतेलाचे भाव वाढले, ते भाव आजही वाढतच आहेत. त्यात गॅस सिलिंडरची भाववाढ हाेत आहे. परिणामी, सर्वसामान्य कुटुंबाचे बजेट कोलमडले आहे. अशास्थितीत काटकसरीशिवाय महिलांसमाेर पर्याय उरला नाही. अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. यातून विविध खाद्यतेलांचे भाव वाढले आहेत. खाद्यतेलाचे भाव वाढल्याचा परिणाम इतर वस्तूंच्या भाववाढीवर होणार आहे. हॉटेल, उपाहारगृहातील विविध खाद्यपदार्थ बनविण्यासाठी तेल वापरात येते. त्यामुळे या सर्वच वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने खाद्यतेल आयात केले तरंच तेलाच्या भाववाढीला आळा बसू शकतो. अन्यथा आगामी काही दिवसात तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.