मुंबईला ड्यूटी, नको रे बाबा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:19 IST2021-03-31T04:19:31+5:302021-03-31T04:19:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : गतवर्षी लातूर जिल्ह्यातील चारशे वाहक-चालकांनी मुंबई बेस्टला सेवा दिली होती. आता परत शंभर चालक-वाहकांची ...

मुंबईला ड्यूटी, नको रे बाबा !
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : गतवर्षी लातूर जिल्ह्यातील चारशे वाहक-चालकांनी मुंबई बेस्टला सेवा दिली होती. आता परत शंभर चालक-वाहकांची नियुक्ती मुंबईसाठी केली आहे. नकार असतानाही त्यांची ड्यूटी ‘बेस्ट’ला लावली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा या पाच आगारांतील प्रत्येकी दहा चालक व दहा वाहकांना मुंबईची ड्यूटी देण्यात आली आहे. यातील बहुतांश चालक, वाहकांनी मुंबईला जाण्याला नकार दिला आहे. परंतु, प्रशासनाचा आदेश असल्याने यांतील बरेचजण मुंबईला गेले आहेत. पुण्या-मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांत चिंता आहे. कुटुंबीयांनी आणि वाहक-चालकांनी नापसंती दर्शविली. परंतु, वरिष्ठांकडून लेखी सूचना आल्यामुळे या वाहक-चालकांना जावे लागले आहे.
लातूर डेपोतील दहापैकी सात वाहक-चालक ड्यूटीला गेले असल्याचे आगार कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. उदगीर, औसा, निलंगा आणि अहमदपूर डेपोतीलही काही वाहक-चालक कर्तव्य म्हणून गेले आहेत. गतवर्षी जिल्ह्यातून दोनशे वाहक-चालक गेले होते. यंदा शंभर वाहक-चालकांची नियुक्ती केली आहे. त्यांतील कितीजण गेले, याबाबतचा आकडा अद्याप स्पष्ट नाही.
गतवर्षी २०० वाहक आणि २०० चालक अशा एकूण ४०० कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविण्यात आले होते. त्यांपैकी सुदैवाने कोणालाही त्रास अथवा कोरोनाची लागण झाली नाही. यंदा ५० वाहक आणि ५० चालकांना पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक डेपोतील १० वाहक आणि चालकांना पाठविण्याचे निश्चित केले आहे. त्यांतील काहीजणांना ऑर्डरही देण्यात आल्या आहेत.
गतवर्षी कोरोनाकाळात मुंबईला सेवा दिली. यंदाही पाठविण्यात येईल, असे निर्देश होते; परंतु, मुंबईला जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता काही वर्षे सेवा राहिली आहे. कोरोनाकाळात बाहेरगावी दीर्घ कालावधीसाठी जाणे प्रकृतीसाठी चांगले नाही; म्हणून मी नकार दिलेला आहे.
- चालक