दमदार पावसामुळे जिल्ह्यात बैलपोळा सण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:24 IST2021-09-07T04:24:45+5:302021-09-07T04:24:45+5:30

भारतीय संस्कृतीत बैलपोळा सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. यंदा मृगाच्या प्रारंभी पाऊस झाल्याने वेळेवर पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर महिनाभर ...

Due to heavy rains, bullfighting festival is in full swing in the district | दमदार पावसामुळे जिल्ह्यात बैलपोळा सण उत्साहात

दमदार पावसामुळे जिल्ह्यात बैलपोळा सण उत्साहात

भारतीय संस्कृतीत बैलपोळा सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. यंदा मृगाच्या प्रारंभी पाऊस झाल्याने वेळेवर पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर महिनाभर पावसाने उघडीप दिल्याने शेतक-यांतून चिंता व्यक्त होत होती. परंतु, गेल्या १५ दिवसांपासून सतत पाऊस होत आहे. त्यामुळे शेतक-यांच्या आशा उंचावल्या आहेत. खरीप हंगामातून काहीतरी पदरी पडणार म्हणून शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सोमवारी बैलपोळा सण असल्याने बाजारपेठाही विविध सजावटीच्या साहित्यांनी सजल्या होत्या.

रविवारी खंदमळणी करण्यात आली. सोमवारी सकाळी शेतक-यांनी बैलांना नदी- ओढ्यावर नेऊन स्वच्छ धुतले. त्यानंतर शिंगांना विविध रंग लावले तर बैलांच्या अंगावर रंगाची पावडर टाकली. तसेच पाठीवर झूल टाकून सजावट केली होती. त्यानंतर घरी आणून पूजा केली. हलकी, ढोल- ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढून मारुतीस प्रदक्षिणा घातली. मारुतीस श्रीफळ अर्पण केल्यानंतर घराच्या दारासमोर आणून शेतक-यांनी सपत्नीक बैलांची पूजा केली. त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला.

या सणानिमित्ताने शेतक-यांसह कुटुंबातील मुलांची धावपळ सुरु होती. त्यांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता. बैलाबरोबरच गाय व अन्य पशुधनाची पूजाही करण्यात आली.

मंगलाष्टिका म्हणत टाकल्या अक्षता...

या सणानिमित्ताने शेतक-यांनी बैलांजवळ मंगलाष्टिका म्हणत अक्षता टाकून आरती केली. यावेळी कुटुंबातील अबालवृध्द उपस्थित होते. गेल्या वर्षी हा सण साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता. यंदा श्रावण महिन्यात चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांच्या चेह-यावर आनंद दिसून येत आहे.

Web Title: Due to heavy rains, bullfighting festival is in full swing in the district