संततधारेमुळे डोंगरशेळकीचा पाझर तलाव फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST2021-07-25T04:18:23+5:302021-07-25T04:18:23+5:30

उदगीर/ डोंगरशेळकी : चार दिवसांपासून सतत होत असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील डोंगरशेळकी येथील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. ...

Due to the continuous flow, the percolation lake of Dongarshelaki burst | संततधारेमुळे डोंगरशेळकीचा पाझर तलाव फुटला

संततधारेमुळे डोंगरशेळकीचा पाझर तलाव फुटला

उदगीर/ डोंगरशेळकी : चार दिवसांपासून सतत होत असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील डोंगरशेळकी येथील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. दरम्यान, शनिवारी दुपारी हा तलाव फुटला. त्यामुळे तलावाखालील जमीन व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांनी महसूल कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

उदगीर तालुक्यात सतत संततधार पाऊस होत आहे. त्यामुळे डोंगरशेळकी येथील पाझर तलाव भरला. दरम्यान, शनिवारी सकाळी या भागातील शेतकरी भारतसिंह ठाकूर यांनी पाझर तलावाला भगदाड पडल्याचे पाहून पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, सरपंच नागरबाई कांबळे व पोलीस पाटील भालचंद्र शेळके यांना तत्काळ कळविले. उपसभापती मरलापल्ले यांनी हा पाझर तलाव फुटण्याच्या मार्गावर असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे, महसूल व पाटबंधारे विभागाला कळविले.

ही माहिती मिळताच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तलावाला पडलेले भगदाड बुजविण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने कसोशीने प्रयत्न केला. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो अयशस्वी झाला. दुपारी १२.१५च्या सुमारास तलाव फुटला. त्याची माहिती तलाठी दत्तात्रय मोरे व पोलीस पाटील भालचंद्र शेळके यांनी ग्रामस्थांना दिली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, तलाव फुटल्यामुळे तलावाखालील जवळपास ५० हेक्टर जमिनीचे व पिकांचे नुकसान झाले. तसेच पाच विहिरी बुजल्या असून, मोटारी, स्प्रिंकलर सेट व पाईपचे नुकसान झाल्याची माहिती उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांनी दिली.

तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मंडल अधिकारी संतोष चव्हाण, पंडित जाधव, पाटबंधारे विभागाचे नाईक, सरपंच नागरबाई कांबळे, उपसरपंच गणपत पवार, माजी सरपंच ज्ञानोबा मुंडे, पोलीस राहुल पुंड, अभिषेक बरूरे, शेतकरी भरतसिंह ठाकूर, पोलीस पाटील भालचंद्र शेळके आदी उपस्थित होते.

पंचनामे करण्याच्या सूचना...

हा तलाव २००५ साली बांधण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेतून सन २०१५मध्ये तलावाची दुरूस्ती करण्यात आली होती, असे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. जमिनी व पीक नुकसानासह पाण्यात वाहून गेलेेेल्या साहित्याचे तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

Web Title: Due to the continuous flow, the percolation lake of Dongarshelaki burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.