कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर केले नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:13 IST2021-02-22T04:13:30+5:302021-02-22T04:13:30+5:30
शहरामध्ये अनेक बुलेटचालक आपल्या वाहनाला कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवत आहेत. फटाक्यांचा आवाज करीत सदरील वाहने रस्त्याने सुसाट धावताना दिसतात. ...

कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर केले नष्ट
शहरामध्ये अनेक बुलेटचालक आपल्या वाहनाला कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवत आहेत. फटाक्यांचा आवाज करीत सदरील वाहने रस्त्याने सुसाट धावताना दिसतात. याला प्रतिबंध घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने चौका-चौकात वाहनांची तपासणी मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत १ ते २० फेब्रुवारी या कालावधीत जवळपास २२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २० हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. तर गतवर्षभरात १७१६ वाहनधारकांवर कारवाई झाली आहे. कारवाईत जप्त करण्यात आलेले सायलेन्सर शनिवारी नष्ट करण्यात आले.
तपासणी मोहिमेला देणार गती
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक एस.यु. पटवारी, सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, पोलीस कर्मचारी सागर झुंजे, रवि गायकवाड, जयराज गायकवाड यांनी एमआयडीसी परिसरातील रस्त्यावर सायलेन्सर नष्ट केले. आगामी काळात वाहनांच्या तपासणी मोहिमेला गती देणार असल्याचे पोनि पटवारी यांनी सांगितले.