मोजक्याच रेल्वे सुरू असल्याने प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:46+5:302021-03-13T04:35:46+5:30
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी इतर शहरात प्लॅटफॉर्म तिकिटात ५० रुपयांची वाढ करण्यात आली ...

मोजक्याच रेल्वे सुरू असल्याने प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट!
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी इतर शहरात प्लॅटफॉर्म तिकिटात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, लातूरच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयेच असून, मोजक्याच रेल्वे सुरू असल्याने, दुपारच्या वेळी रेल्वे स्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
लातूरहून मुंबई, नागपूर, धनबाद, पनवेल, यशवंतपूर, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी लॉकडाऊन काळात रेल्वेसेवा बंद होती. परिस्थिती पूर्वपदावर येत असताना, काही रेल्वेच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. लातूरहून मुंबईला जाण्यासाठी बिदरहून विशेष रेल्वे असून, त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळे ही रेल्वे सुरू करण्यात आली आहे. त्यासोबतच नागपूर आणि कोल्हापूरला जाण्यासाठीही रेल्वे सुरू करण्यात येत आहे. इतर जिल्ह्यात रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले आहे. मात्र, लातूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट दर १० रुपये असून, रात्री मुंबईला जाणाऱ्या रेल्वेच्या वेळी काही प्रमाणात गर्दी होती. मात्र, रेल्वे स्थानक प्रशासनाच्या वतीने मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
बिदर-मुंबई रेल्वेला प्रतिसाद...
नियमितपणे लातूरहून मोठ्या प्रमाणात रेल्वे धावत होत्या. कोरोनाच्या संकटामुळे प्रवासी संख्या घटली, तसेच काही रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद पाहता, बिदर-मुंबई रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, कोल्हापूर, धनबाद या रेल्वेही सुरू करण्याचे नियोजन होत आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन...
लातूर रेल्वे स्थानक प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे. दररोज स्थानकाची स्वच्छता केली जात असून, मास्क वापरण्यासाठी जनजागृती केली जात आहे. दुपारच्या वेळी स्थानकावर शुकशुकाट असला, तरी रात्रीच्या वेळी परिसर गजबजलेला असतो.
मुंबईला जाण्यासाठी आमच्या मित्राला सोडण्यासाठी स्थानकावर आलो होतो. या ठिकाणी मास्क वापराबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून १० रुपयांचे प्लेटफॉम तिकीट काढले आहे
- प्रतिक्रिया
सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. रेल्वे प्रवासातही मास्क, सॅनिटायझरचा वापर करतो. मुंबईला जाण्यासाठी स्थानकावर आलो आहे. - प्रतिक्रिया
मार्गदर्शक सूचनांचे पालन...
रेल्वे स्थानक परिसरात नियमित स्वच्छता केली जात आहे. बिदर-मुंबई या रेल्वेच्या वेळी प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
- तिवारी, रेल्वे स्थानक प्रमुख, लातूर