अहमदपूर तालुक्यातील १२३ गावाच्या गावठाणाची ड्रोनने मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:20 IST2021-03-17T04:20:08+5:302021-03-17T04:20:08+5:30

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग भूमि अभिलेख आणि सर्व्हे ऑफ इंडियाच्या संयुक्त उपक्रमाने राज्य आणि केंद्र सरकारचे स्वामित्व योजना ...

Drone survey of 123 villages in Ahmedpur taluka | अहमदपूर तालुक्यातील १२३ गावाच्या गावठाणाची ड्रोनने मोजणी

अहमदपूर तालुक्यातील १२३ गावाच्या गावठाणाची ड्रोनने मोजणी

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग भूमि अभिलेख आणि सर्व्हे ऑफ इंडियाच्या संयुक्त उपक्रमाने राज्य आणि केंद्र सरकारचे स्वामित्व योजना कार्यान्वित हाेत आहे. लातूर जिल्ह्यातील तीन तालुक्यात हा सर्वे झाला असून, अहमदपूर तालुक्याची माेजणी १७ मार्चपासून होणार आहे. यामध्ये ड्रोनद्वारे गावठाणातील हद्दीतील सर्वच मिळकतीचे मोजमाप होणार आहेत. मोजणी झाल्यानंतर लगेच सिटीसर्वे होणार आहे. या सर्वेत गावठाणातील मिळकतीचे आणि मालकी हक्काचे अभिलेखपत्र तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे गावातील छोटे-छाेटे वाद ग्रामपंचायत मालकीची जागा यासंबंधीचे असणारे वाद हे मिटणार असून, कायमस्वरुपी मालमत्ता पत्रक प्रत्येक नागरिकांना मिळणार आहे. या अभियानाची सुरुवात १७ मार्च पासून होणार असून, अहमदपूर तालुक्यातील १२३ गावांपैकी आठ गावांचा सिटीसर्वे झाला आहे. त्यामध्ये किनगाव, हाडोळती, शिरूर ताजबंद, कुमठा बु., खंडाळी, चिखली, अंधोरी, रोकडा सावरगावचा समावेश आहे. मात्र या गावात ड्रोनद्वारे मोजणी झाली नाही त्यामुळे या आठ गावांसह पूर्ण १२३ गावांतील गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर अभिलेख तयार करण्यात येणार आहे. याबाबतची बैठक तहसील कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी सुदाम जाधव आणि उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी अमोल देलवाड, भुमिअभिलेख आर. के. डाहोरे, मुखायलय सहायक डी.जी. कुलकर्णी, पर्यवेक्षक भूमापक विजय बिराजदार, अशोक शिनगारे, डी.जी. तेलंगे यांच्यासह ग्रामसेवक, भूमिअभिलेख विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

ड्रोनच्या मोजणीद्वारे होणारे फायदे...

गावठाणातील प्रत्येक मालकी हक्काचे अभिलेखपत्रक तयार होईल. ग्रामपंचायत कर आकारणी बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलन,यासाठी नकाशे उपलब्ध हाेणार आहेत. त्यामुळे गावच्या विकासासाठी नियोजन सुलभ हाेणार आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता कराची व्याप्ती वाढेल, महसुलात वाढ होईल, ग्रामपंचायत मालमत्ता करनिर्धारण पत्रक नमुना नंबर आठ तयार होतील. हस्तांतराच्या नोंदी अद्ययावत करणे सहज हाेणार आहे. परिणामी, पारदर्शकता वाढेल. गावठाण हद्दीतील ग्रामपंचायत मिळकत शासनाच्या मिळकती आणि सार्वजनिक मिळकती त्यांच्या चतु:सीमा निश्चित हाेणार आहेत. यातून कुठल्याही प्रकारचा क्षेत्र हद्दीचा वाद राहणार नाही. या माेजणीमुळे अहमदपूर तालुक्यातील सर्वच गावठाणांची अद्यावत मोजणी हाेणार असून, याचा नागरिकांना फायदा होणार आहे.

Web Title: Drone survey of 123 villages in Ahmedpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.