खरीप पेरणीपूर्वीच दरवाढीचा "डोस"; खतांचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:15+5:302021-03-13T04:35:15+5:30
कोरोनाच्या संकट काळात शेती व्यवसायाने सर्वसामान्यांची गरज भागविली. लॉकडाऊन काळातही नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करून दिला जात होता. मात्र, अतिवृष्टीसारख्या ...

खरीप पेरणीपूर्वीच दरवाढीचा "डोस"; खतांचे दर वाढले
कोरोनाच्या संकट काळात शेती व्यवसायाने सर्वसामान्यांची गरज भागविली. लॉकडाऊन काळातही नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करून दिला जात होता. मात्र, अतिवृष्टीसारख्या संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. कोरोनाची परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठीचे अर्थचक्र बदलले आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असतानाच खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
...तर उत्पन्न वाढणार कसे
शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. मजूर मिळत नसल्याने पेरणी, नांगरणी यासारख्या कामांसाठी ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागत आहे. मळणीसाठी ट्रॅक्टर, हार्वेस्टर उपयोगात आणले जात आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने मशागतीच्या कामांचे दरही वाढले आहेत. असे असतानाच खतांच्या दरात वाढ झाली आहे. दरवाढीचे मीटर असेच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
खताचे नाव आधीचे दर आताचे दर
१०-२६-२६ ११७५ १४५०
१९-१९-१९ १२८५ १५००
१२-३२-१६ ११८५ १४६०
२४-२४ १२२० १३५०
डीएपी १२०० १५००
कोरोनाच्या काळात शेतमाल विक्रीसाठी अडचणी आल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. आता इंधन दरवाढीबरोबर खतांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी. - शेतकरी
अनेक जण खरीप हंगामाच्या आधीच खते, बियाणे खरेदी करतात. सर्वसामान्य महागाईमुळे भरडला जात आहे. दोनशे ते अडीचशे रुपयांनी खताची दरवाढ झाली आहे. आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. - शेतकरी
रब्बी हंगाम संपत आला आहे. खरीप हंगामासाठी अनेक शेतकरी महिन्याआधीच खतांची खरेदी करून ठेवतात. यंदा दरवाढ असल्याने अल्पसा प्रतिसाद मिळत आहे.
विनोदकुमार भुतडा, खतविक्रेते, अहमदपूर