मंगरुळ आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी जागा दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:19 IST2021-03-26T04:19:54+5:302021-03-26T04:19:54+5:30
जळकोट तालुक्यातील मंगरूळ येथे दोन महिन्यापूर्वी नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले होते. त्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय ...

मंगरुळ आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी जागा दान
जळकोट तालुक्यातील मंगरूळ येथे दोन महिन्यापूर्वी नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले होते. त्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पाठपुरावा केल्याने हे केंद्र मंजूर झाले. मात्र, हे प्राथमिक आरोग्य केंद्र कुठे बांधावे, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर मंगरूळ पाटीजवळ एका खाजगी शेतकऱ्याची दोन एकर जमीन घेऊन त्यावर इमारत बांधण्याचे निश्चित झाले. त्या अनुषंगाने सदरील शेतकऱ्याने आपली दोन एकर जमीन दान देण्याचे कबूल करुन दानपत्र करुन दिले आहे. त्यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे, सरपंच महेताब बेग, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांनी पुढाकार घेतला होता. सदरील दोन एकर जमिनीमध्ये सुमारे दहा कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारली जाणार आहे. या आरोग्य केंद्रामुळे परिसरातील गावांतील रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळणार आहे.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आरोग्य केंद्र मंजुरीपासून ते जागेचे दानपत्र होईपर्यंत पाठपुरावा केला. तालुक्यात दोन महिन्याच्या काळात दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळवून घेतली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय गोयल यांनी मंगरूळ पाटीवर उभारण्यात येणा-या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेची पाहणी करून दानपत्रसंदर्भात सरपंच महेताब बेग यांना सूचना केल्या.