लस घेण्यापूर्वी करा रक्तदान, नंतर दोन महिने थांबावे लागणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST2021-03-15T04:18:19+5:302021-03-15T04:18:19+5:30
गतवर्षी कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य शासनाने रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यास जिल्ह्यात उत्स्फूर्त ...

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान, नंतर दोन महिने थांबावे लागणार!
गतवर्षी कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य शासनाने रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यास जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील सहाही रक्तपेढ्यांमध्ये विपुल रक्तसाठा झाला होता. यंदा कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने लसीचा दुसरा डोस घेतल्यापासून २८ दिवसांनंतर रक्तदान करावे, अशा मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. त्याचा रक्त संकलनावर परिणाम होण्याची शक्यता रक्तपेढ्यांच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी लसीकरणापूर्वी रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन केले आहे.
मार्च ते जून या कालावधीत तापमान वाढते. त्यामुळे सतत थकवा जाणवतो. तसेच परीक्षांचा कालावधी असतो आणि महाविद्यालयांना सुट्ट्या असतात. त्यामुळे युवकांकडून रक्तदानाचे प्रमाण कमी होते. याउलट या कालावधीत अपघात वाढतात. त्यामुळे रक्ताची अधिक गरज भासत असते. रक्तदानासाठी समाजात जनजागृतीची गरज आहे.
दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी करा रक्तदान...
कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. दुसरा डोस घेतल्यापासून २८ दिवसांनंतर रक्तदान करता येते. त्यामुळे लस घेतल्यापासून ५६ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करणे महत्त्वाचे ठरत आहे.
संकलित केलेले रक्त हे दुसऱ्या व्यक्तीस दिले जाते. त्यामुळे रक्त लागणाऱ्यावर कुठलाही परिणाम होऊ नये, म्हणून शासनाने या सूचना केल्या आहेत. ५५ वर्षांपुढील व्यक्तींचे शक्यतो रक्त घेतले जात नाही. रक्तदानासाठी जनजागृती आवश्यक आहे.
कोरोना लसीकरणाआधी मी केले रक्तदान, तुम्हीही करा...
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून संबोधले जाते. त्यामुळे मी नियमितपणे रक्तदान करतो. दरम्यान, वैद्यकीय संस्थेतील प्राध्यापकांनी लस घेतल्यानंतर रक्तदान करता येत नाही, असे सांगितले. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून मी रक्तदान केले आणि त्यानंतर लस घेतली. तुम्हीही रक्तदान करुन लस घ्या, असे गगन समुखराव याने सांगितले.
ब्लड बँक प्रमुख म्हणतात...
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करणे आवश्यक आहे. त्याचा परिणाम रक्तदानावर होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून शासनाबरोबर सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन रक्तदानाची जनजागृती करणे आवश्यक आहे.
- डॉ. उमेश कानडे, शासकीय रक्तपेढी प्रमुख.
नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे रक्तदानाचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करणे गरजेेच ठरत आहे. शासनाने मोबाईल ब्लड डोनेशन व्हॅन सुरू केल्यास कुठेही ५ ते ६ जणही रक्तदान करू इच्छिणारे असतील तर तिथे जाऊन रक्तसंकलन करता येईल. शासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
- डॉ. के. टी. दळवे, रक्तपेढी प्रमुख