रुग्णांना आरोग्य सेवा देत डाॅक्टर, कर्मचारी घेताहेत स्वत:ची अन् कुटुंबियांची काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST2021-04-05T04:17:43+5:302021-04-05T04:17:43+5:30
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बाधितांचा आलेख उंचावला आहे. वर्षभराच्या कालावधीत सप्टेंबरनंतर मार्चमध्ये सर्वाधिक बाधितांची नोंद झाली ...

रुग्णांना आरोग्य सेवा देत डाॅक्टर, कर्मचारी घेताहेत स्वत:ची अन् कुटुंबियांची काळजी
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बाधितांचा आलेख उंचावला आहे. वर्षभराच्या कालावधीत सप्टेंबरनंतर मार्चमध्ये सर्वाधिक बाधितांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी म्हणून आरोग्य यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. जिल्ह्यात १६ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, तेथील डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी रुग्णांना सेवा देण्याबरोबर स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घेत आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कोविड केअर सेंटरच्या संख्येत वाढ केली आहे. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये जवळपास ३७५ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. पूर्वी या कर्मचाऱ्यांना सलग सेवा दिल्यास आरामासाठी सुटी दिली जात असे. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील डाॅक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी आठवडाभर कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसेवा दिल्यानंतर दक्षता म्हणून ते क्वारंटाईनमध्ये राहत असत. सध्या वाढती रुग्णसंख्या व अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वत:बरोबर कुटुंबियांची काळजी घ्यावी लागत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा आलेख उंचावला आहे. गेल्यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ९ हजार ११८ रुग्ण आढळले होते. मार्चमध्ये ८ हजार ५६ रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे आरोग्य सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन राहता येत नाही. परिणामी, डाॅक्टरांसह कर्मचारी सेवा देण्याबरोबर स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेत आहेत.
- डाॅ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक
कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेवा देताना कुटुंबाची काळजी वाटते. मात्र कर्तव्य महत्वाचे आहे. कुटुंबियांच्या काळजीने आम्ही ड्युटीवरून घरी गेलो की, थेट आंघोळ करतो. तसेच मिठाच्या गुळण्या करतो. त्याशिवाय, कुठल्याही वस्तूला हात लावत नाही. - डाॅ. अशोक सारडा
कुटुंबात पती आणि तीन वर्षांचा मुलगा आहे. कोविड केअर सेंटरवरून घरी गेल्यानंतर आम्ही कुणाच्याही संपर्कात येत नाही. थेट आंघोळ करते. मुलाची प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून काही गोळ्याही देत आहे. संपूर्ण स्वच्छता झाल्यानंतरच घरकाम सुरू करते.
- डाॅ. आयेशा खान
रुग्णांना सेवा देणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. घरी जाताना सुरुवातीला मास्क काढून तेथेच ठेवते. त्यानंतर नवीन मास्क चेहऱ्यावर लावून घरी जाते. घरी गेल्यानंतर थेट डोक्यावरून दररोज आंघोळ करते. वर्षभरापासून ही दिनचर्या कायम सुरू आहे.
- डाॅ. संगीता अकमार-शेटे