डॉक्टर, लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:19 IST2021-04-08T04:19:44+5:302021-04-08T04:19:44+5:30
लातूर : जिल्ह्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आठ लाख नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. मात्र आतापर्यंत फक्त एक लाख तीस हजारांच्या ...

डॉक्टर, लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही!
लातूर : जिल्ह्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आठ लाख नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. मात्र आतापर्यंत फक्त एक लाख तीस हजारांच्या आसपास नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लस घेण्याबाबत समज-गैरसमज असल्यामुळे लस घेणाऱ्यांचे प्रमाण थोडे कमीच आहे. आता जनजागृतीमुळे त्यात थोडा वेग आला आहे. शिवाय, अनेक मद्यपींकडून डॉक्टरांना सल्ला विचारला जातोय की लसीकरणानंतर आणि अगोदर किती दिवस मद्यपान करायचे नाही. आता डॉक्टरांचा मोलाचा सल्ला प्राप्त होताच लसीकरणाला आणखीन गती येईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
लस घेण्याअगोदर किंवा घेतल्यानंतर मद्यपान करावे की करू नये, याबाबत केंद्र वा राज्य शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. त्यामुळे शासकीय यंत्रणा याबाबत काही सल्ला द्यायला तयार नाही. मात्र लातुरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी लस घेण्यापूर्वी दोन-तीन दिवस व घेतल्यानंतर पाच-सात दिवस मद्यपान करू नये, असा सल्ला दिला आहे. मद्यपान केल्यानंतर अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे पाच-सात दिवस दारू पिणे टाळायला हवे, असा सल्ला डॉक्टरांचा आहे. आता लसीकरण करून महामारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मद्यपींना एवढी कळ सोसायला काहीच हरकत नाही.
दारू आणि लसीचा तसा काही संबंध नाही. लस घेतल्यानंतर काहींना हलका ताप येणे, हात-पाय किंवा अंगदुखीचा हलका त्रास जाणवतो. लस घेऊन दारू पिल्यावर हे लक्षणे कळणार नाहीत. आजारी पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतरही पाच-सात दिवस दारू पिणे टाळलेलेच बरे. जेणेकरून लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचा फायदा आपल्याला होईल.
डॉ. विश्रांत भारती
एम. डी. मेडिसिन
लस कोरोना व्हायरसविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी आहे. प्रतिकारशक्ती निर्माण करताना दारूच्या अशक्तपणाचा डोस कशासाठी घ्यायचा. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वांनी लस घ्यावी. जे कोणी मद्यपान करतात, त्यांनी लस घेण्यापूर्वी व घेतल्यानंतर किमान पाच ते सात दिवस दारू पिणे टाळावे. अधिक दिवस टाळल्यास ते शरीरासाठी चांगलेच आहे. यामुळे प्रतिकारशक्तीत भरच पडेल.
डॉ. महेंद्र सोनवणे,
एम. डी. मेडिसिन
सतत दारू पिणे शरीराला हानिकारक आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी शासन-प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शासनाच्या सर्व उपक्रमांत सहभाग नोंदवून कोरोनाला रोखण्यासाठी मदत करायला हवी. लस घेतल्यानंतर व घेण्यापूर्वी शौकिनांनी पाच-सात दिवस दारू नाही पिली तर काय हरकत आहे.
डॉ. मारुती कराळे
एम. डी. मेडिसिन