तलवारबाजी स्पर्ध‌ेत ज्ञानेश्वरी, माहीची चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST2021-03-25T04:19:24+5:302021-03-25T04:19:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : माही आरदवाडची उत्कृष्ट आक्रमकता व ज्ञानेश्वरी शिंदेच्या संयमी बचावात्मक खेळीने राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी ...

Dnyaneshwari, Mahi's shine in fencing competition | तलवारबाजी स्पर्ध‌ेत ज्ञानेश्वरी, माहीची चमक

तलवारबाजी स्पर्ध‌ेत ज्ञानेश्वरी, माहीची चमक

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : माही आरदवाडची उत्कृष्ट आक्रमकता व ज्ञानेश्वरी शिंदेच्या संयमी बचावात्मक खेळीने राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत लातूरच्या या दोघींनी धारदार कामगिरी करत स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले आहे. तलवारबाजीतील या दोघींच्या यशाने लातूरची तलवारबाजी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर गाजली आहे.

उत्तराखंड राज्यातील रूद्रपूर येथे १५ ते २२ मार्चदरम्यान राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा पार पडल्या. त्यात अहमदपूरच्या महात्मा फुले ज्युनिअर महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी शिंदे व जवळगा येथील किलबिल नॅशनल स्कूलची माही आरदवाड यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात ज्ञानेश्वरी शिंदेने इप्पी प्रकारात तर माही आरदवाडने सेबर प्रकारात कांस्यपदकाची कमाई करत महाराष्ट्राला यश मिळवून दिले. माहीची उत्कृष्ट ॲटॅकिंग खेळी व ज्ञानेश्वरी शिंदेची डिफेन्सिव्ह खेळी राज्याला पदक मिळवून देणारी ठरली. यापूर्वी माही आरदवाडने राज्य शालेय १४ वर्षे वयोगटांत सुवर्णपदक पटकाविले होते तर ज्ञानेश्वरी शिंदेने १९ वर्षे शालेय राज्य स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रौप्यपदक पटकाविले होते. थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही या दोघींनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते तसेच नांदेड येथे मार्चच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या या स्पर्धेत या दोघींनी उत्कृष्ट कामगिरी करत लातूरला पदके मिळवून दिली आहेत. माही आरदवाडने १४ वर्षे ते सिनिअर गटात आजतागायत अनेकवेळा प्रतिनिधित्व करत लातूरसह राज्याला विविध पदके मिळवून दिली आहेत तर ज्ञानेश्वरी शिंदेने १७ व १९ वर्षे वयोगटांसह संघटनेमार्फत आयोजित सिनिअर गटात सुवर्णपदक मिळवून दिले आहे. राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेतील त्यांच्या या धारदार खेळीमुळे त्यांचे कौतुक होत आहे. या दोघींना प्रशिक्षक वजिरोद्दीन काझी, वैभव कज्जेवाड, मोहसीन शेख, बबलू पठाण, कृष्णा शिंदे, आकाश बनसोडे, जयदीप नागरगोजे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे प्राचार्य एस. आर. जाधव, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते दत्ता गलाले, अजित शिंदे, प्रा. डाॅ. अभिजित मोरे, संतोष कदम यांनी कौतुक केले.

ज्युनिअर असूनही सिनिअर गटात दबदबा

ज्ञानेश्वरी शिंदे इयत्ता बारावीत शिकत असून, माही आरदवाड नववीमध्ये शिकत आहे तरीही या दोघींनी सिनिअर गटात आपल्या कौशल्याच्या जोरावर बाजी मारली आहे.

ज्युनिअर गटात तर या दोघींनी विविध पदके पटकाविली असून, या राष्ट्रीय स्पर्धेत ज्ञानेश्वरी शिंदेने वरिष्ठ गटात कांस्य तर माहीने कनिष्ठ गटात कांस्यपदक पटकावून लातूरचे नाव उंचावले आहे.

Web Title: Dnyaneshwari, Mahi's shine in fencing competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.