वीज कनेक्शन तोडल्यामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:07+5:302021-06-21T04:15:07+5:30
लातूर : लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पावरील वीजबिलासाठी कनेक्शन तोडल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय आला होता. दरम्यान, ...

वीज कनेक्शन तोडल्यामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय
लातूर : लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पावरील वीजबिलासाठी कनेक्शन तोडल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय आला होता. दरम्यान, तीन महिन्यांचे बिल भरल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, रविवारी दुपारनंतर शहराचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती मनपाच्या पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली. मांजरा प्रकल्पावरील वीज पुरवठ्याचे १ कोटी ९२ लाखांचे बिल थकले होते. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित केला होता.
दरम्यान, रविवारी सकाळी लातूर मनपाने मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे वीजबिल भरणा केल्यानंतर महावितरणने वीज पुरवठा पूर्ववत केला. त्यानंतर लातूर शहराला पाणी पुरवठा सुरू झाला. राजधानी, महात्मा बसवेश्वर चौक आणि शासकीय कॉलनी येथील जलकुंभावरून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. वीजबिल थकल्यामुळे यापूर्वी दोनवेळा शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. परंतु, गेल्या तीन दिवसांपासून वीजबिलामुळेच पाणी पुरवठा बंद होता. धनेगाव, हरंगुळ आणि आर्वी येथील वीजबिल थकले आहे. धनेगाव येथील वीज पुरवठा सुरळीत झाला असून, हरंगुळ व आर्वी येथील वीजबिलाबाबत महावितरणने मनपाला वीजबिल भरण्यासंदर्भात नोटीस पाठवली असल्याचेही सांगण्यात आले.
तीन दिवसांपासून पाणी पुरवठा होता ठप्प
लातूर शहराचा पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून ठप्प होता. ज्या भागामध्ये शुक्रवारी पाणी येणार होते, त्या भागामध्ये आता तीन दिवसांनंतर उशिरा पाणी येणार आहे. सध्या शासकीय कॉलनी, महात्मा बसवेश्वर चौक आणि राजधानी जलकुंभावरून पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. पहिल्या टप्प्यातील हा पाणी पुरवठा रविवारी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सोमवारी अन्य जलकुंभांवरून पाणी सोडले जाणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता कलवले यांनी सांगितले.