युवा दिनी ऑनलाईन जनजागृती व्याख्यान
लातूर : १२ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. युवा वर्ग हा एचआयव्ही / एड्स संदर्भात अधिक संवेदनशील असून त्यानिमित्त युवा वर्गामध्ये एड्सबाबत जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. युवा वर्ग सृजनशील असल्यामुळे विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्यात जागृकता निर्माण व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यात युवा पिढीमध्ये एचआयव्ही/ एड्स विषयी अभियान वेगवेगळया उपक्रमातून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोयायटी, मुंबई अंतर्गत शासनाच्या काेविडबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करून १२ ते २६ ऑगस्ट या काळात ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात ऑनलाईन पोस्टर स्पर्धा, रक्तदान शिबिर त्याचबराेबर रेड रिबन क्लबच्यावतीने सोशल मीडियाचा वापर करून जनजागृती करण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालयात एचआयव्ही तपासणी, उपचार मोफत आणि गोपनीय आहे, या विविध कार्यक्रमात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी केले आहे.
लातूर शहरातील ४ केंद्रांवर लसीकरण
लातूर : शहर महानगरपालिकेच्यावतीने चार केंद्रांवर कोविड-१९ लसीकरण हाेत आहे. १८ ऑगस्ट २०२१ रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी पुढीलप्रमाणे आहे. १८ वर्षांपुढील वयोगटासाठीचे (कोव्हॅक्सीन फक्त दुसरा डोस) मोफत कोविड लसीकरण केंद्र पुढीलप्रमाणे आहे. दयांनद कॉलेज बार्शी रोड, लातूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर, प्रा. ना. आरोग्य केंद्र, मंठाळे नगर, (मनपा शाळा क्र.९) आणि पंडित जवाहरलाल नेहरू मनपा रुग्णालय पटेल चौक, लातूर येथे (दुपारी १२ ते सायं. ५) येथे १८ वर्षे आणि त्यापुढील वयोगटासाठी कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे. कोव्हॅक्सीन १८ वर्षे व त्यापुढील वयोगट फक्त दुसरा डोस (पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील) लसीकरणासाठी येताना लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व मोबाईल फोन सोबत ठेवावे. जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.