पीकविमा भरलेल्या रकमेत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST2021-09-11T04:21:25+5:302021-09-11T04:21:25+5:30

खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळावी म्हणून बाकली व बिबराळ येथील शेतक-यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत भाग घेऊन ...

The difference in the amount paid for crop insurance | पीकविमा भरलेल्या रकमेत तफावत

पीकविमा भरलेल्या रकमेत तफावत

खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळावी म्हणून बाकली व बिबराळ येथील शेतक-यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत भाग घेऊन बिबराळ येथील महा-ई- सेवा केंद्रामार्फत पीकविमा भरला होता. पीकविमा भरण्यासाठीचा कालावधी कमी असल्याने आणि सातत्याने इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने काही शेतक-यांनी पीकविम्याचा अर्ज आणि सदरील क्षेत्राच्या पीकविम्याचा हप्ता केंद्र चालकाकडे दिला होता. गर्दीमुळे केंद्र चालकाने आपण वेळेनुसार पीकविमा भरु असे सांगून आपल्या स्वत:जवळील पावत्या दिल्या होत्या.

दरम्यान, दोन महिने उलटल्यानंतर काही शेतक-यांनी पीकविम्यासंदर्भात चौकशी करण्यास सुरुवात केली तेव्हा पीकविम्याच्या हप्त्यापोटी भरलेली रक्कम आणि प्रत्यक्षात भरण्यात आलेल्या रकमेत तफावत आढळून आली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी थेट तहसीलदारांकडे धाव घेतली. आपली कैफियत तहसीलदारांपुढे मांडली. तसेच निवेदनही दिले आहे. निवेदनावर जवळपास ८० ते ८५ शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत.

चौकशी केली जाईल...

महा-ई- सेवा केंद्र चालकाकडून देण्यात आलेली पावती आणि ऑनलाईनरित्या भरण्यात आलेली रकमेची पाहणी करुन चौकशी करण्यात येईल. जर त्यात तफावत आढळून आली तर केंद्र चालकावर कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार अतुल जटाळे यांनी सांगितले.

Web Title: The difference in the amount paid for crop insurance