रेणापूर येथील डिझेल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मुरुड येथे एका ट्रकमध्ये बसून येत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मुरुड सबस्टेशन येथे सापळा लावला. या माहितीप्रमाणे एम एच ४४-७७८७ या क्रमांकाच्या ट्रकमधून तो समोरून येत असल्याचे निदर्शनास आले. ट्रक थांबून विचारपूस केली असता, त्याने आपले नाव राजेंद्र काळे (रा.आंदोरा, ह.मुक्काम कनेरवाडी ता. कळंब) असल्याचे सांगितले. आरोपीने साथीदाराच्या मदतीने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. गुन्ह्यात चोरलेले डिझेल ट्रकमध्ये पाठीमागे प्लास्टिकच्या कॅनमध्ये भरून ठेवल्याचेही सांगितले. त्यानुसार आरोपी काळे यास अटक करून त्याच्याकडून वापरलेला गुन्ह्यातील ट्रक तसेच ३८५ लीटर डिझेल असा एकूण १० लाख ३६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या पथकातील सुधीर सूर्यवंशी, राजेंद्र टेकाळे, अंगद कोतवाल, राम गवारे, प्रकाश भोसले, हरी भोसले, राजू मस्के, नवनाथ हसबे, नितीन कटारे यांनी परिश्रम घेतले.
डिझेल चोर पोलिसांच्या जाळ्यात; १० लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST