खरोळ्याच्या सरपंचपदी धनंजय देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:33 IST2021-02-06T04:33:58+5:302021-02-06T04:33:58+5:30
रेणापूर : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड करण्यात आली. यामध्ये खरोळ्याच्या सरपंचपदी धनंजय देशमुख, सिंधगावच्या सरपंचपदी स्वाती सुनील ...

खरोळ्याच्या सरपंचपदी धनंजय देशमुख
रेणापूर : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड करण्यात आली. यामध्ये खरोळ्याच्या सरपंचपदी धनंजय देशमुख, सिंधगावच्या सरपंचपदी स्वाती सुनील चेवले, पळशीच्या सरपंचपदी वर्षा गुणवंत भंडारे, खलंग्रीच्या सरपंचपदी महानंदा गोविंद करमुडे यांची तर माकेगावच्या सरपंचपदी प्रभाकर त्र्यंबकराव केंद्रे यांची गुरुवारी निवड करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाले होते. त्यामुळे सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीकडे लक्ष लागून होते. गुरुवारपासून सरपंच, उपसरपंच पदांच्या निवडीला सुरुवात झाली आहे. गुरुवारी खरोळा, सिंधगाव, माकेगाव, पळशी, खलंग्री येथील सरपंच व उपसरपंचांची निवड झाली. पाचपैकी चार ग्रामपंचायतींमध्ये एकमेव अर्ज आल्यामुळे निवड बिनविरोध झाली.
तालुक्यातील सर्वात मोठ्या खरोळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी धनंजय देशमुख व लक्ष्मण शिंदे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच उपसरपंच पदासाठी शेख इनायतअली महेताब व पांडुरंगा आदुडे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे सरपंच आणि उपसरपंच पदांसाठी मतदान घेण्यात आले. त्यात धनंजय देशमुख यांना ११ तर त्यांचे प्रतिस्पर्धी लक्ष्मण शिंदे यांना ३ मते मिळाली. देशमुख हे बहुमताने विजयी झाले. तसेच उपसरपंच पदासाठी शेख इनायतअली महेताब यांना ११ व त्यांचे प्रतिस्पर्धी पांडुरंगा आदुडे यांना ३ मते मिळाली. त्यामुळे उपसरपंच म्हणून शेख इनायतअली महेताब यांची निवड झाली. यावेळी अध्यासी अधिकारी गोविंद काळे होते.
सिंधगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाती सुनील चेवले तर उपसरपंचपदी लक्ष्मण कुंभार यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून एन. बी. कुमठेकर यांनी काम पाहिले. पळशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा गुणवंत भंडारे व उपसरपंचपदी दशरथ जाधव यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून एस. एन. नरहरे यांनी तर त्यांना सहाय्यक म्हणून ग्रामसेवक रवींद्र पारेकर यांनी काम पाहिले. खलंग्री ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महानंद गोविंद करमुडे व उपसरपंचपदी जोगेश्वरी गोविंद माने यांची निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून जी. यु. पुरी तर सहाय्यक म्हणून ग्रामसेवक संतोष औसेकर यांनी काम पाहिले. माकेगावच्या सरपंचपदी प्रभाकर त्र्यंबकराव केंद्रे व उपसरपंचपदी अनिता निवृत्ती लहाने यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राहुल पाटील, नायब तहसीलदार गोविंद येरमे यांनी दिली.