बसेसच्या फेऱ्या वाढूनही डिझेलचाच निघतोय खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST2021-08-29T04:21:35+5:302021-08-29T04:21:35+5:30
उदगीर : टाळेबंदीच्या काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ...

बसेसच्या फेऱ्या वाढूनही डिझेलचाच निघतोय खर्च
उदगीर : टाळेबंदीच्या काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बसेस सुरु झाल्या. सध्या प्रवासी भारमान वाढले असले तरी बसच्या फेऱ्यातून केवळ डिझेलचाच खर्च निघत आहे. परिणामी, दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने सर्वच व्यवहार बंद पडले होते. शासनाने एसटी बस वाहतूक सेवाही बंद केली होती. त्यामुळे उदगीर बसस्थानकातून धावणाऱ्या बसेसही बंद झाल्या होत्या. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ५० टक्क्यांसह प्रवासी वाहतूक सुरु झाली. परंतु, अहमदपूर व लातूर या दोनच शहरापुरती वाहतूक सुरु होती. सुरुवातीला दिवसभरात १३ ते १४ फेऱ्या होत होत्या. हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाचे नियम शिथिल केले आणि उदगीर बसस्थानातून सुटणाऱ्या बसेसच्या संख्येत वाढ होत गेली. आता येथील बसस्थानकातून पुणे, औरंगाबाद, शेगाव, लातूर, अहमदपूर, सोलापूरसह हैदराबाद, निजामाबाद या आंतरराज्य बसेस धावत आहेत. आता दिवसातून ३२० बस फेऱ्या होत असून त्यातून ८ लाखाचे उत्पन्न मिळत आहे. हे उत्पन्न जेमतेम असल्याने डिझेलचा खर्च निघत आहे. दरम्यान, उत्पन्न घटल्याने दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही.
प्रवासी संख्या वाढणे गरजेचे...
सध्या सण, उत्सव सुरु झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार बसेसच्या फेऱ्यांतही वाढ केली आहे. दररोज ३२० बस फेऱ्यातून ८ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. यातून केवळ डिझेलचा खर्च निघत आहे. दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. त्यामुळे कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. प्रवासी संख्या वाढल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला पूर्वीचे दिवस येतील.
- यशवंत कानतोडे, स्थानक प्रमुख, उदगीर.